देशातील पाच राज्यांच्या निकालानंतर संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार, ४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या राज्यातील निकालांचे परिणाम अधिवेशनात दिसण्याची शक्यता असून तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. दरम्यान, हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. अधिवेशनात पराभवाचा राग काढण्यापेक्षा सकारात्मक विचार करा. नकारात्मक वृत्तीला देशाने नाकारलं आहे हे निवडणूक निकालचं सांगत आहेत. निवडणुकीतल्या पराभावाचा राग लोकसभेत काढू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
सध्याचे निकाल पाहिल्यास विरोधकांना आपल्यात बदल करण्याची सुवर्णसंधी आहे. गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेला प्रकार थांबवून विकासासाठी एकत्र या. विकसित भारत होण्यासाठी आता जास्त काळ वाट पहावी लागणार नाही. या पराभवाचा राग संसदेत काढू नका. सकारात्मकाता ठेवल्यास देश तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणार आहे. पराभवामुळे तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. प्रत्येकाचे भविष्य उज्ज्वल आहे. परंतु, बाहेरचा राग संसदेत काढू नका. लोकशाहीच्या या मंदिराला कुस्तीचा आखडा बनवू नका. देशाहितासाठी चर्चा करा. चांगल्या कामांना पाठिंबा द्या. कारण लोकशाहीत विरोधी पक्ष महत्वाचा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
देशाने नकारात्मकता नाकारली आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. आम्ही सतत विरोधकांबरोबर चर्चा करण्याची तयारी ठेवतो. तुमच्या वृत्तीमुळे तुमच्याबद्दल देशात तिरस्कार निर्माण झाला आहे तुमच्याबद्दल त्याचं रुपांतर प्रेमात करायचं असेल तर नकारात्मकता सोडा, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला आहे. आम्हाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. लोकशाहीचे हे मंदिर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे आहे. विकसित भारतासाठी हा महत्वाचा मंच आहे. खासदारांनी चांगला अभ्यास करुन विधेयकावर चर्चा करावी. परंतु चर्चाच झाली नाही तर देशाचे नुकसान होते, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
तेलंगणमधील पराभवाला स्वतः केसीआरच कारणीभूत
निकालाआधीच रेवंथ रेड्डी यांना भेटून पुष्पगुच्छ देणे भोवले
पाकिस्तानात दहशतवाद्यांकडून बसवर गोळीबार
परदेशांतील प्रसारमाध्यमांकडूनही मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक
प्रत्येक समुदायाचे, शेतकरी, देशाचे गरीब लोक या सगळ्यांचे बळ आपल्याला वाढवायचे आहे. त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला चांगल्या योजना आणायच्या आहेत. विकासाच्या तत्त्वांना घेऊन जे पुढे जातात त्यांना पाठिंबा मिळतोच. जेव्हा चांगलं शासन आणि प्रशासन असतं तेव्हा अँटी इन्कंबन्सी हा शब्द निष्फळ ठरतो. आम्ही पारदर्शक काम करतो आहोत. तीन राज्यांमध्ये मिळालेला जनादेश उत्तम आहे. त्यानंतर आपण नव्या संसदेत अधिवेशन घेत आहोत. यावेळी दीर्घ काळासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काम करता येणार आहे. आपलं सदन नवं आहे कदाचित व्यवस्थांमध्ये काही कमतरता असू शकतात. त्यावर सगळ्यांनी सूचना देणं आवश्यक आहे, काही त्रुटी असतील त्या जरुर लक्षात आणून द्या, असे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केलं आहे.