महाविकास आघाडीचा आज पायी महामोर्चा झाला आहे. ज्यावेळी या मोर्चाची घोषणा झाली, तेव्हा अनेकांनी उद्धव ठाकरेंना तुम्ही चालणार का असा सवाल केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे चालतात की नाही? यावर आता चर्चा रंगू लागली आहे.
महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या मोर्चात उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रानंतर असे दृष्य देशाने नव्हे तर जगाने पहिल्यांदा पहिले असेल. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, पण अजूनही बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
या मोर्चात सर्व पक्ष एकवटले आहेत. जे महाराष्ट्रद्रोही आहेत ते फक्त या मोर्चात नाहीत. स्वत:ला बाळासाहेबांच्या विचार पुढे घेऊन जाणारे तोतये समजतात. पण, त्यांचे विचार दिल्लीशी लाचारी करणारे नव्हते. खुर्ची गेली तर बेहत्तर पण महाराष्ट्राच्या स्वाभीमान आणि अस्मितेशी तडजोड करणार नाही. असं कोणी करण्याचा प्रयत्न करेन, त्याला गुडघ्यावर झुकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या या भाषणात तोचतोचपणा होता. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका, त्यांना खोके सरकार संबोधन, महाराष्ट्रातील उद्योगधंदे, हेच त्यांच्या भाषणात दिसून आले आहे. दरम्यान, या मोर्च्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे मोठ्या प्रमाणात दिसत होते.
तसेच शरद पवार हे मोर्चात बोलत होते. ते म्हणाले, या राज्यकर्त्यांमध्ये कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची स्पर्धा नसून महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू झाली आहे. यावेळी त्यांनी महात्मा फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख केला आहे. आज लोक शांत आहेत. राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असंही शरद पवार यांनी यावेळी नमूद केले आहे.
हे ही वाचा:
महापुरुषांसाठी की शिंदे-फडणवीस सरकारला विरोध करण्यासाठी महामोर्चा?
उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल
‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’
दरम्यान, या मोर्चाला ठाकरे कुटुंबीय, संजय राऊत, शरद पवार, अजित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे यासह अनेक नेते सहभागी होते. मात्र, अशोक चव्हाण हे या मोर्चाला उपस्थित नव्हते, त्याची चर्चासुद्धा या मोर्चात रंगली होती.