दिल्लीतील शेतकरी आंदोलन दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असताना राकेश टिकैत यांच्यावर त्यांच्याच साथीदारांकडून टीका होताना दिसत आहे. “टिकैत यांना यश मिळालं तर त्यांचं अभिनंदन, अन्यथा आम्ही आंदोलन हातात घेऊ.” असे वक्तव्य राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी केले आहे.
राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेने २६ जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर या आंदोलनातून काढता पाय घेतला होता. व्ही. एम. सिंग यांनीच पत्रकार परिषदेतून घोषणा करून आंदोलनातून त्यांची संघटना बाहेर पडत असल्याचे सांगितले होते.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत मात्र त्या हिंसाचारानंतरही आंदोलनात तसेच राहिले. आंदोलनकर्त्यांना भडकाव्यामध्येही टिकैत यांचा हात असल्याचे अनेक व्हिडिओ प्रसार माध्यमांमधून समोर आले होते. सिंग यांनी आंदोलनातून बाहेर पडताना टिकैत यांच्यावरच हिंसाचाराला पाठिंबा देण्याचा आरोप केला होता. “आम्ही ‘शहीद’ होण्यासाठी दिल्लीला आलेलो नाही.” असे सूचक वक्तव्य त्यावेळेस सिंग यांनी केले होते.
२६ जानेवारीनंतर अनेक संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व निर्विवादपणे राकेश टिकैत यांच्याकडे आले. त्याच पार्श्वभूमीवर व्ही.एम. सिंग यांचे विधान अत्यंत महत्वाचे आहे. या विधानावरून आंदोलनकर्त्या नेत्यांमध्ये मतभेद आणि स्पर्धा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.