२०१७ सालच्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून भारतीय जनता पार्टी सत्तारूढ झाली आणि योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांची कारकीर्द ही सरकारच्या अनेक निर्णयांमुळे चांगलीच गाजली. पण या संपूर्ण कारकिर्दीत उत्तर प्रदेशात होत असलेले शहरांचे अथवा जिल्ह्यांचे नामांतर हा एक मोठा चर्चेचा विषय राहिला आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून आता उत्तर प्रदेशातील काही शहरांचे नाव बदलले जाऊ शकते. यामध्ये अलिगढ, मैनपूरी, फिरोजाबाद या शहरांचा समावेश आहे. अलिगडचे नाव बदलून हरिगड करण्यात यावे, तर मैनपुरी हे नाव बदलून मयन नगर केले जावे असा प्रस्ताव आहे. तर फिरोजाबादचे नामकरण चंद्रनगर केले जावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक
तालिबानचे ‘उदार’ धोरण एका दिवसात बंद
ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?
पोलीस महासंचालकांचेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट
अलीगड, मैनपूरी आणि फिरोजाबाद येथील जिल्हा पंचायतमध्ये हे नामांतराचे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे आणि तो पारीत देखील झाला आहे. त्यामुळे आता हे प्रस्ताव आदित्यनाथ यांच्या सरकारकडे पारित करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे आता योगी आदित्यनाथ यावर नेमका काय निर्णय घेतात ते बघणे महत्त्वाचे ठरेल. उत्तर प्रदेशमध्ये काही महिन्यांपूर्वीच जिल्हा पंचायत निवडणुकांचे निकाल लागले असून भारतीय जनता पार्टीला यात घवघवीत यश मिळाले आहे. तर उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका २०२२ मध्ये येऊन ठेपल्या आहेत. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता शहरांचे नामांतर हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
या आधी देखील आदित्यनाथ यांच्या सरकारने काही महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलली आहेत. ज्यानुसार अलाहाबादचे नामकरण प्रयाग्रज असे करण्यात आले आहे. तर फैजाबाद जिल्ह्याचे नामांतर अयोध्या केले गेले आहे. या सोबतच मुगलसरायचे नाव बदलून पंडित दीन दयाळ नगर असे करण्यात आले आहे.