पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचं रण तापत असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी टीएमसीच्या दोन नेत्यांची तीन कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई केली असून त्यामुळे टीएमसीमध्ये खळबळ उडाली आहे.
टीएमसीचे प्रवक्ता कुणाल घोष आणि टीएमसीचे खासदार शताब्दी रॉय यांच्यासह शारदा समूहाच्या प्रमुख सुदिप्त सेन यांच्या सहकारी देवजारी मुखर्जी यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या तिघांची एकूण तीन कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. एप्रिल २०१३ मध्ये शारदा चिट फंड घोटाळा उघड झाला होता. हा घोटाळा तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
ईडीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी कुणाल घोष, शताब्दी रॉय आणि देवजारी मुखर्जींकडून ३ कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. २ मार्च रोजी घोष यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
कोळसा घोटाळ्यात ममतांचे हात काळे
मुंबईत लॉकडाऊन लावण्याची शक्यता नाही- किशोरी पेडणेकर
नक्षली हल्ल्यात वीस जवान हुतात्मा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली उच्च स्तरीय बैठक
टीएमसीचे माजी खासदार कुणाल घोष हे शारदा मीडिया समूहाचे सीईओ होते. मीडिया समूहाचा प्रमुख होण्यासाठी त्यांनी शारदा समूहाकडून मोठी रक्कम घेतल्याचा घोष यांच्यावर आरोप आहे. घोष यांची यापूर्वी जुलै २०१९ मध्ये आणि ऑक्टोबर २०१३मध्ये याप्रकरणी तपास यंत्रणांनी चौकशी केली होती. त्यांची तुरुंगातही रवानगी करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर आहेत. ईडीने नुकतेच त्यांना चौकशीसाठी बोलवले होते.