राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून ईडीने त्यांच्या कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. नागपूर आणि अहमदनगरमधील जमीन जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणात प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून डिसेंबर २०२१ मध्ये तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच पुढे त्यांनी बोलावल्यास आपण चौकशीला जाऊ, असेही तनपुरे म्हणाले होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे २५ हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. नंतर हा गुन्हा ईडीने तपासासाठी घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अनेक कारखान्यांना कर्ज दिलं आहे. त्या सहकारी साखर कारखान्यांनी ते कर्ज फेडल नाही. त्यामुळे बँकेने ते कारखाने जप्त केलेत. हे जप्त केलेले कारखाने बँकेवर संचालक असलेल्या लोकांच्या नातेवाईकांनीच कमी किंमतीत विकत घेतले.
हे ही वाचा:
कुस्तीपटू रवी दहियाने ‘यासार डोगू’ मालिकेत जिंकले सुवर्णपदक!
युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार केंद्रीय मंत्री
नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; मुलगा फराझची होणार चौकशी
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याचा भाजपामध्ये प्रवेश
२०१२ मध्ये या कारखान्याचा लिलाव जाहीर करण्यात आला. त्यावेळी प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे हे बँकेच्या संचालक मंडळावर होते. कारखान्याचा लिलाव जाहीर केला तेव्हा कारखान्याची विक्री किंमत २६ कोटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाईड या कंपनीने तो केवळ १३ कोटी रुपयांना विकत घेतला होता.