आरोग्य विभाग भरती परीक्षेचा गोंधळ सुरूच! पेपर फुटल्याचा आरोप

आरोग्य विभाग भरती परीक्षेचा गोंधळ सुरूच! पेपर फुटल्याचा आरोप

राज्यात आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. आज आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत अनेक ठिकाणी पेपर फुटण्याचे प्रकार घडले. त्यामुळे परीक्षार्थ्यांना खूपच मनस्तापाला सामोरे जावे लागले. तर काही ठिकाणी परीक्षार्थी पेपर देण्यापासून वंचितही राहिले.

आज रविवार, ३१ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने गट ड संवर्गातील विविध पदांसाठी भरती परीक्षा घेतली गेली. राज्यभरातील विविध शहरांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. पण या भरती परीक्षेतील गोंधळाचा सिलसिला यावेळेसही पाहिला मिळाला. राज्यात अनेक ठिकाणी परीक्षेआधीच पेपर फुटण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

हे ही वाचा:

खासदार सुप्रिया सुळे आर्यन खानला झालेल्या अटकेने व्यथित

१०० कोटी वसुली प्रकरणात संतोष जगताप अटकेत

युगायुगांत एकच व्यक्ती ‘सरदार’ होऊ शकते…

‘दाऊदसोबत विमानात कोण बसले होते, हे शरद पवारांनी सांगावे’

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचून देखील आत मध्ये प्रवेश दिला गेला नाही. कारण परीक्षा केंद्राचा पत्ता तसेच आसन क्रमांक परीक्षा केंद्रावर उपलब्धच नव्हते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. यामध्ये गोंदिया, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. वास्तविक आरोग्य विभागाच्या परीक्षेची वेळ दोन ते चार असूनही पेपर अडीच वाजता सुरू करण्यात आले.

तर पेपरच्या एक तास आधी हा भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप केला जातोय. सोशल मीडियावर या पेपरचे फोटो व्हायरल झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेची मागणी केली आहे. पुणे शहरात देखील ‘गट ड’ प्रवर्गाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले आहेत.

या घटनेवरून भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. डरकाळ्या फोडणार्‍या वाघाची सत्ते पुढे शेळी झाली आहे असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. तसेच प्रशासन हाताळणे मुख्यमंत्र्यांच्या हाताबाहेर गेले आहे तेव्हा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील चित्रा वाघ यांनी केली आहे.

Exit mobile version