प्रियांका वड्रा, सचिन पायलट यांना बदलले!

प्रियांका गांधी वड्रा यांना कोणत्याच राज्याची जबाबदारी नाही

प्रियांका वड्रा, सचिन पायलट यांना बदलले!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेते सचिन पायलट यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली असून त्यांना छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, उत्तर प्रदेशचे पक्षाचे सरचिटणीस म्हणून अविनाश पांडे यांची नियुक्ती झाली आहे. ते प्रियांका गांधी यांच्याकडून सूत्रे घेतील. प्रियांका गांधी वड्रा यांना कोणत्याच राज्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर कोणती जबाबदारी दिली जाईल, याकडे तमाम काँग्रेसजनांचे लक्ष लागले आहे.

 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चारपैकी तीन राज्यांत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी विविध राज्यांची जबाबदारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना देण्यात आली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना गुजरातची तर, रणदीपसिंह सुरजेवाला यांना कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, जयराम रमेश हे सरचिटणीस म्हणून संपर्क विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळतील. के. सी. वेणुगोपाल हे पक्षाचे सरचिटणीस म्हणून कायम राहतील. तर, ज्येष्ठ नेते अजय माकन यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाने १२ सरचिटणीसांसह ११ राज्यांच्या प्रभारींचीही नियुक्ती केली. त्यात जीएस मिर यांना झारखंड आणि प. बंगालचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर, दीपा दासमुन्शी यांना केरळ, लक्षद्वीपसह तेलंगणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्राची जबाबदारी रमेश चेन्नीथाला यांना देण्यात आली आहे. तर, बिहारची धुरा मोहन प्रकाश सांभाळतील. मेघालय, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशची जबाबदारी डॉ. चेल्लाकुमार यांना देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

 राम लल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी सीताराम येचुरी उपस्थित राहणार नाहीत

मुंबईच्या चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार, एकाचा मृत्यू!

उदयनिधीनंतर दयानिधींना उबळ, ‘उ. प्र., बिहारमधले हिंदीभाषिक तमिळनाडूत शौचालये स्वच्छ करतात’

हिजाब बंदीवरून सिद्धरामय्या यांचा युटर्न

ओडिशा, तमिळनाडू आणि पुडुचेरीची धुरा डॉ. अजोय कुमार यांच्याकडे तर, जम्मू काश्मीरची धुरा भारतसिंग सोलंकी यांच्याकडे आहे. हिमाचल प्रदेश आणि चंडिगडची जबाबदारी राजीव शुक्ला यांच्याकडे आहे. राजस्थानची जबाबदारी सुखजिंदरसिंग रांधवा यांच्याकडे आहे. तर, पंजाबचे पक्षाचे काम देवेंदर यादव सांभाळतील. गोवा, दमण आणि दीव व दादरा हवेली या राज्यांची जबाबदारी माणिकराव ठाकरे यांना देण्यात आली आहे. तर, त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर आणि नागालँडची जबाबदारी गिरीश चोडांकर्म यांना देण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, अंदमान निकोबारची धुरा माणिकम टागोर यांना देण्यात आली आहे.

Exit mobile version