केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियांका गांधी- वाड्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक करत त्यांनी घेतलेल्या एका निर्णयासाठी त्यांचे आभार मानले आहेत. अमित शाह यांनी आश्वासन पूर्ण केल्याने प्रियांका वाड्रा यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.
वायनाडच्या खासदार प्रियांका वाड्रा यांनी ४ डिसेंबर रोजी संसदेच्या अधिवेशनादरम्यान गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती आणि वायनाडमधील भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीला ‘गंभीर नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी सोमवारी गृहमंत्र्यांनी मान्य केली आणि वायनाड भूस्खलन ही ‘गंभीर नैसर्गिक आपत्ती’ म्हणून घोषित केली. त्यामुळे प्रियांका यांनी अमित शाह यांचे आभार मानले आहेत. त्यांनी एक्स पोस्टमधून आभार मानत म्हटले आहे की, “मला आनंद झाला आहे की, अमित शाह यांनी अखेर वायनाड दुर्घटनेला ‘गंभीर नैसर्गिक आपत्ती’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुनर्वसनाची गरज असलेल्यांना खूप मदत होईल आणि हे निश्चितपणे योग्य दिशेने एक पाऊल आहे. त्यासाठी पुरेसा निधीही लवकरात लवकर दिला गेला तर आम्ही सर्व कृतज्ञ राहू.” गृह मंत्रालयाने वायनाड दुर्घटनेला ‘गंभीर नैसर्गिक आपत्ती’ म्हणून घोषित केल्यामुळे लोकांच्या पुनर्वसनात मोठी मदत होईल असा विश्वास प्रियांका गांधी यांनी व्यक्त केला आहे.
I am glad @AmitShah ji has finally taken the decision to declare the Wayanad tragedy as a “Disaster of Severe Nature”. This will greatly help those in need of rehabilitation and is definitely a step in the right direction.
We will all be grateful if adequate funds for the same…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 30, 2024
काही दिवसांपूर्वी वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली केरळच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्याचबरोबर भूस्खलनग्रस्तांना केंद्र सरकारकडूनही मदत मागण्यात आली होती. सध्या वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांकडे कोणतीही मदत यंत्रणा उरलेली नाही. केंद्राने पावले उचलली पाहिजेत. मानवतावादी दृष्टिकोनातून या प्रकरणावर राजकारण करू नये आणि तेथील लोकांना मदत करावी, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले होते.
हे ही वाचा :
गाझियाबादमध्ये चमत्कार! वीज पडलेल्या शेतातील खड्ड्यात सापडले ‘शिवलिंग’
धक्कादायक! मालेगावात १,००० रोहिंग्या, बांगलादेशींना दिले जन्म दाखले!
देशभरात शोककळा अन राहुल गांधींचा नववर्ष साजरा करण्यासाठी परदेश दौरा!
तालिबानी फतवा; महिला दिसू नयेत म्हणून खिडक्याच नकोत!
वायनाडमध्ये २९ जुलै रोजी रात्री अनेक ठिकाणी दरड कोसळली होती. मुंडक्काई, चुरलमला, अट्टामाला आणि नूलपुझा भूस्खलनामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. आकडेवारीनुसार, भूस्खलनामुळे २०० हून अधिक मृत्यू झाले तर अनेक जखमी झाले आणि हजारो बेघर झाले. केरळमधल्या आपत्तीसाठी २०२४- २५ मध्ये ३८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. १४५.६० कोटी रुपयांचा पहिला हप्ता ३१ जुलै रोजी आणि १४५.६० कोटी रुपयांचा दुसरा हप्ता १ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला.