महाराष्ट्रा सह देशात सध्या राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कोणता पक्ष राज्यसभेत कोणाला पाठवणार यावर सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. अशातच काँग्रेस पक्षाच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती पुढे येत आहे. सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी वाड्रा यांना राज्यसभेत पाठवण्यात यावे अशी मागणी काँग्रेसमधील एक गट करताना दिसत आहे. प्रियांका यांना आता संसदेत पाठवावे असे या विशिष्ट गटाचे म्हणणे आहे.
प्रियांका गांधी वाड्रा या सध्या काँग्रेस पक्षाचा सरचिटणीस असून पक्षात चांगल्याच सक्रिय आहेत.त्यांनी पक्षासाठी आजवर अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पण असे असले तरी अजूनही त्या संसदीय राजकारणाच्या भाग झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत प्रियांका यांनीही आता संसदेत प्रवेश करावा आणि कॉंग्रेस पक्षाची बाजू अधिक बळकट करावी असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
मला खोट्या केसेसमध्ये गुंतवण्याचा डाव, अमित साटम यांचा दावा
जवानांना घेऊन जाणारी बस नदीत पडली, ७ जवान मृत
वीरप्पन गॅंग फुल फॉर्ममध्ये! मलनिस्सारण विभागात २१ हजार कोटींचा घोटाळा
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौटालांना चार वर्षांचा तुरुंगवास
असे असले तरी अद्याप काँग्रेस हायकमांडने याबाबत कोणताही निर्णय घेतल्याचे समजत नाही किंवा खुद्द प्रियांका यांची याबाबतीत काय मते आहेत हे देखील प्रकाशझोतात आलेले नाही. त्यामुळे प्रियंका गांधींच्या राज्यसभा प्रवेशाचे नेमके काय होणार? याकडे सध्या देशाचे लक्ष लागले आहे. तर प्रियांका यांना राज्यसभेत पाठवायचा निर्णय काँग्रेसने घेतला तर एक परिवार एक तिकीट या संकल्पनेला गांधी कुटुंबियांकडूनच पहिला तडा जाणार का? याची देखील कुजबूज पाहायला मिळत आहे.