25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणपरिवारवादाची तळी उचलण्याचे दिवस आता संपले प्रियांकाजी!

परिवारवादाची तळी उचलण्याचे दिवस आता संपले प्रियांकाजी!

आमचा परिवार हीच तुमची जबाबदारी आहे, अशा अर्थानेच तुम्ही गांधी परिवारालाही साथ दिली पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे असे प्रियांका सुचवू पाहतात.

Google News Follow

Related

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आणि त्याचे पडसाद स्वाभाविकपणे देशभर उमटले. काँग्रेसने देशभरात आंदोलने, मोर्चे, सत्याग्रह हाती घेतले. दिल्लीतील अशाच एका सत्याग्रहाच्या निमित्ताने बोलताना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी राहुल गांधींवर झालेल्या अन्यायावर बोलता बोलता परिवारावादालाच खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला.   रामायण, महाभारत यांचा आधार घेत तेव्हा कसे परिवारासाठी झटण्याचा धर्म सगळे पाळत होते, असे प्रियांका म्हणाल्या.

प्रभू श्रीरामाने परिवार हा धर्म म्हणत त्याचे पालन केले तर पांडवांनीही संस्कारांसाठी परिवाराचा विचार केला, वगैरे भाष्य त्यांनी केले. खरे तर त्यांना यातून नेमके काय म्हणायचे आहे हे कळायला मार्ग नाही. मात्र त्याच्यातून एक अर्थ हा निघतो की, रामायण, महाभारत काळातील राजेमहाराजांचे उदाहरण देत गांधी परिवाराशी त्याचा संबंध जोडताना आपल्या परिवाराकडेही लोकांनी त्या अर्थानेच पाहायला हवे. आमचा परिवार हीच तुमची जबाबदारी आहे, अशा अर्थानेच तुम्ही गांधी परिवारालाही साथ दिली पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे असे प्रियांका सुचवू पाहतात.

राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई हे केवळ एक निमित्त असते खरा विचार मांडायचा असतो तो परिवारवादाचा. कारण अगदी स्पष्ट आहे. राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सगळे काँग्रेसजन रस्त्यावर उतरले ते निव्वळ राहुल गांधी यांना वाचविण्यासाठी या दिवसांत महागाई, बेरोजगारी हे मुद्दे मागे पडले. राहुल गांधी यांच्याबद्दल निष्ठा दाखविणे हे एकमेव उद्दीष्ट प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे बनले. त्यामुळे भलेही राहुल गांधी यांना लोकशाही मार्गानेच शिक्षा झाली आहे आणि ती शिक्षा ठोठावण्यात आली म्हणूनच लोकसभेने त्यांचे सदस्यत्व रद्द ठरल्याचे सांगितले हे बहुधा काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते विसरून गेले. लोकशाही संपत चालली आहे असे म्हणणाऱ्या काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास राहिला नाही तो असा.

हे ही वाचा:

आठ वर्षीय मंगोलियन मुलगा होणार तिबेटचा तिसरा धर्मगुरू

वाचलो!! एअर इंडिया-नेपाळ एअरलाइन्स विमानांची टक्कर टळली

नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्याने रुमाल पेटवून जाळण्याचा प्रयत्न; मुंब्र्यात घडली घटना

काळवीट मारल्यामुळे सलमानला ‘तो’ देत होता धमक्या; अखेर पोलिसांना सापडलाच

प्रियांका गांधी यांनी रामायण, महाभारताच्या काळाचा उल्लेख केला. पण तो काळ राजेमहाराजांचा होता. तेव्हा आपल्या मुलांना किंवा मुलींना राज्यकारभाराची सूत्रे सोपविणे हे ओघाने येतच होते. पण आता काळ बदलला आहे हे बहुधा प्रियांका गांधी यांना मान्य नसावे. अजूनही गांधी कुटुंब हेच देशावर राज्य करत आहे आणि त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या त्यागाचा विचार करून त्यांनाच सत्तेवर बसवावे असा संदेश प्रियांका आपल्या भाषणातून देऊ पाहतात. त्यासाठी त्या भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या नंतरचा प्रसंग सांगतात.

राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे पार्थिव लष्करी वाहनावरून नेत असताना राहुल गांधी यांनी त्या गाडीसोबत चालण्याचे ठरविले पण आई सोनिया यांनी त्यास नकार दिला मात्र मी त्याला चालण्यास हरकत नाही अशी भूमिका घेतली तेव्हा राहुल गाडीसोबत चालू लागला. याच ठिकाणी राजीव गांधी यांच्या पार्थिवाला त्याने अग्नी दिला. अशा देशासाठी बलिदान करणाऱ्या व्यक्तींचा अपमान देशात होत आहे. प्रियांका गांधी किंवा गांधी कुटुंबातील कुणीही ही उदाहरणे देतात तेव्हा त्यागाकडे लक्ष वेधतानाच सहानुभूती मिळविणे हाही उद्देश असतोच. देशासाठी कुणीही केलेल्या त्यागाबद्दल प्रत्येकाला आदर आहे आणि तो असला पाहिजे पण त्याचा नियमित उल्लेख करून आपल्याकडेही त्यादृष्टीने पाहावे असा अट्टहास कशाला? आपल्या पूर्वजांच्या कर्मावर आपल्या कर्तृत्वाचे इमले कसे काय बांधता येतील? कर्तृत्व हे आपणच आपले निर्माण केले पाहिजे.

आज नेमकी हीच परिस्थिती देशातील सर्वच परिवारवादी राजकीय घराण्यांची झालेली आहे. त्यांना आपल्या पूर्वजांच्या कर्माचे दाखले देऊनच आपली वाटचाल करावी लागते आहे. महाराष्ट्रातील ठाकरे घराण्याचे उदाहरण ताजे आहे. आजही बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचे दाखले देऊन मतांचा जोगवा मागितला जातो. अर्थात, बाळासाहेब ठाकरे हे मोठे नेते होतेच पण त्यांच्यापलिकडे जात आपले कर्तृत्व सिद्ध करून त्या बळावर लोकांच्या मनावर राज्य करायला हरकत नाही. पण ते झालेले दिसत नाही. त्यामुळेच मग बाळासाहेबांचे विचार चोरले, आमच्या पक्षाचे नाव चोरले अशी भावना व्यक्त होते. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी बाळासाहेबांचा फोटो वापरू नये, ते माझे वडील आहेत ही भावना या परिवारवादातूनच येते. महाराष्ट्रातील पवार कुटुंब, उत्तर प्रदेशातील मुलायम सिंग यादव किंवा बिहारमधील लालूप्रसाद यादव कुटुंब ही अशीच उदाहरणे म्हणता येतील.

प्रियांका गांधी यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की आजचा काळ हा लोकशाहीचा आहे. ज्या लोकशाहीबद्दल तुम्ही सातत्याने ओरड करत असता की लोकशाही संपुष्टात आली, लोकशाहीची हत्या झाली त्याच लोकशाहीत परिवारवादाला स्थान नाही. लोकांना खंबीर नेतृत्व हवे, जे परिवारातूनच आले पाहिजे असे लोकांना अजिबात वाटत नाही. त्यामुळे लोक या परिवारवादी पक्षांना, त्यांच्या राजकारणाला कंटाळले आहेत.

गेल्या १० वर्षांत आणि त्याआधीच्या १५ वर्षांत देशात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व उदयास आले. नरेंद्र मोदींच्या मागे कुठल्या राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी नाही. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे ते परिवारवादाचा विरोधही करू शकतात. मात्र त्यामुळेच असेल कदाचित की, हे सगळे परिवारवादी पक्ष नरेंद्र मोदींना पाण्यात पाहतात. कारण त्यांच्या या विरोधी भूमिकेमुळे परिवारवादाची पाळेमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ती नष्ट झाली तर देशाच्या राजकारणावर इतकी वर्षे मिळविलेली पकड सैल होणार आहे. अर्थात, ती होऊ लागलेलीच आहे. कारण लोकांना आता कुटुंबवादी राजकारण नकोसे झाले आहे. कर्तृत्व सिद्ध करा नाहीतर घरी बसा असा सरळ साधा हिशेब आता लोक मांडू लागले आहेत. तेव्हा हा सहानुभूतीचा मुखवटा धारण करून लोकांची मने जिंकण्याचे दिवस आता संपले आहेत हे लक्षात घेतले तर बरे!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा