दिल्ली येथे देशातील प्रमुख कुस्तीगीरांनी कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलेले असताना आता त्यात राजकारण शिरले आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी या कुस्तीगीरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात हे आंदोलन सुरू आहे. बृजभूषण सिंह यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांची लैंगिक शोषणप्रकरणी चौकशी व्हावी अशी कुस्तीगीरांची मागणी आहे. बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक असे प्रमुख कुस्तीगीर या आंदोलनात उतरले आहेत. प्रियांका गांधी यांनी भेट घेतल्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कुस्तीगीरांना भेटण्यासाठी जाणार आहेत.
जंतरमंतरवर हे कुस्तीगीर दुसऱ्यांदा आंदोलनासाठी बसले आहेत. आता बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
प्रियांका गांधी यांनी कुस्तीगीरांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, जे एफआयआर दाखल केले आहेत, त्याची माहिती कुणालाही नाही. ते एफआयआर का दाखवले जात नाहीत. जेव्हा हे कुस्तीगीर पदके जिंकतात तेव्हा सगळे त्यांच्या कौतुकासाठी ट्विट करतात पण आज ते आंदोलनासाठी रस्त्यावर बसले आहेत तेव्हा कुणीही त्यांना न्याय देत नाही. या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी या महिला कुस्तीगीर प्रचंड संघर्ष करतात. मला हे समजत नाही की सरकार खेळाडूंची ज्यांच्याविरोधात तक्रार आहे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न का करत आहेत?
हे ही वाचा:
पोलिसांनी पानटपऱ्या कातरल्या; ५०० दुकानांवर कारवाई
चित्ते मृत्यू प्रकरणी दक्षिण आफ्रिकेकडून मोदींची पाठराखण
सत्यपाल मलिक यांच्यावर पाच तास प्रश्नांची सरबत्ती
…तर बृजभूषण सिंह राजीनामा देण्यास तयार
प्रियांका गांधी म्हणाल्या की, मला पंतप्रधानांकडून आशा नाही. कारण जर त्यांना खेळाडूंची चिंता असती तर त्यांनी खेळाडूंची भेट घेतली असती. उलट सरकार त्यांना (बृजभूषण) वाचविण्याचा का प्रयत्न करत आहेत?
बृजभूषण सिंह यांच्याविरोधात शुक्रवारी पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केले आहेत. पॉक्सो कायद्यांतर्गतही त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. एफआयआर दाखल केल्यानंतर ज्या ठिकाणी आंदोलन आहे तेथील वीज कापण्यात आली असून पाण्याचीही व्यवस्था नाही, असा आरोप कुस्तीगीर बजरंग पुनियाने केला आहे.