महागाई, जीएसटी, बेरोजगारी, ईडी कारवाईच्या विरोधात कॉंग्रेसने देशभरात आंदोलन केले. महागाई, ईडी विरोधात कॉंग्रेस गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाली होती. आज त्याचे रुपांतर आंदोलनात झाले. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी व अन्य कॉंग्रेस खासदारांसह संसदेत काळे कपडे घालून निदर्शने केली. नंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसद भवनापासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी हा मोर्चा अडवून त्यांना ताब्यात घेतले. प्रियंका गांधी यासुद्धा कॉंग्रेस खासदारांसह आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
प्रियंका गांधी यांनी रस्त्यातच ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आले. प्रियंका गांधी यांच्या बरोबरच कॉंग्रेस खासदार अजय माकन, सचिन पायलट, हरीश रावत, अभिनाश पांडे यांच्यासह अन्य ६४ कॉंग्रेस खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कॉंग्रेसचे आंदोलन लक्षात घेऊन दिल्लीमध्ये पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच
थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू
पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी
पुलवामामध्ये ग्रेनेड हल्ल्यात मजुराचा मृत्यू
काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरातही पोलिसांच्या ताब्यात
देशाबरोबरच महाराष्ट्रातही या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. राजभवनाजवळ मोर्चा काढून निदर्शने करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न हाणून पाडत पोलिसांनी यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, बाळासाहेब थोरात यांना ताब्यात घेतले. पुणे आणि नागपूरमध्येही निदर्शने करण्यात आली. नागपूरमध्ये बॅरिकेटिंग तोडून आत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महिला कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.