ताफा अडविल्याप्रकरणी पंतप्रधानांना काय म्हणाले, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती?

ताफा अडविल्याप्रकरणी पंतप्रधानांना काय म्हणाले, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांची भेट घेतली. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याला झालेल्या अडवणुकीच्या संदर्भात ही भेट झाली आहे.

त्यात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल पंतप्रधानांशी चर्चा करून सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी झालेल्या भेटीनंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे की, राष्ट्रपतीजींशी भेट झाली. त्यांनी जी विचारपूस केली त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांनी शुभेच्छाही दिल्या. राष्ट्रपती हे नेहमीच आम्हाला बळ देत असतात.

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी या झाल्याप्रकाराबद्दल चर्चा केली. उपराष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. भविष्यात सुरक्षेसंबंधीच्या प्रोटोकॉलचे गांभीर्याने पालन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी कठोर पावले उचलली जायला हवीत, जेणेकरून अशी चूक होणार नाही, असे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

पहिल्या ‘ममी’ वरील संशोधन पूर्ण! ‘ही’ तथ्ये आली समोर

ठाकरे सरकारची दडपशाही सुरूच! भाजपाचे जितेन गजारिया यांच्या कार्यालयात सायबर पोलीस

सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाबद्दल फिरोजपूर एसएसपी निलंबित

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या जामीन अर्जाची सुनावणी लांबणीवर

 

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाबमधील फिरोजपूर येथे दौरा होता. तेथे विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते. जवळपास ४२ हजार कोटींच्या कामांचे उद्घाटन पंतप्रधान करणार होते. पण तेथे जाताना त्यांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडविला आणि २० मिनिटे पंतप्रधानांना थांबावे लागले. नंतर त्यांचा ताफा मागे वळला आणि नियोजित ठिकाणचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यावरून देशभरात संताप व्यक्त करण्यात येत असून काँग्रेसशासित पंजाबमध्ये पोलिसांच्या सुरक्षा नियोजनाचे कसे तीनतेरा वाजले आहेत, याचे हे निदर्शक असल्याची भावना व्यक्त होते आहे. यासंदर्भात फिरोजपूरचे एसएसपी निलंबित झाले आहेत तर या प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाने मागविला आहे.

Exit mobile version