‘शिवलिंगावरील विंचू’ वक्तव्यामुळे पंतप्रधानांची बदनामी; थरूर यांना न्यायालयाने फटकारले

दिल्ली उच्च न्यायालयाने दिला दणका

‘शिवलिंगावरील विंचू’ वक्तव्यामुळे पंतप्रधानांची बदनामी; थरूर यांना न्यायालयाने फटकारले

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात ‘शिवलिंगावरील विंचू’ असे भाष्य केले होते. या प्रकरणी मानहानीचा दावा करण्यात आला होता. तर, शशी थरूर यांनी त्यांच्या विरोधातील मानहानीची कार्यवाही रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना दणका देत शशी थरूर यांच्या विरोधातील मानहानीची कारवाई रद्द करण्यास नकार दिला आहे.

न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदिरट्टा यांनी मानहानीच्या कारवाईला आव्हान देणारी थरूर यांची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच, दोन्ही पक्षांना १० सप्टेंबर रोजी ट्रायल कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधानांवर करण्यात आलेले आरोप प्रथमदर्शनी घृणास्पद आणि निषेधार्ह असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या टिप्पण्यांमुळे पंतप्रधान, भारतीय जनता पक्ष तसेच त्यांचे पदाधिकारी आणि सदस्य यांची बदनामी झाली आहे, अशी टिपण्णी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

गोरेगावमध्ये हिट अँड रन; अल्पवयीन चालकाच्या गाडीच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

राजकोट किल्ला दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक

मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत रस्सीखेच नाही!

सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील

शशी थरूर यांनी ट्रायल कोर्टाच्या २७ एप्रिल २०१९ च्या आदेशाला रद्द करण्याची मागणी केली होती, ज्या अंतर्गत त्यांना भाजपा नेते राजीव बब्बर यांनी दाखल केलेल्या गुन्हेगारी मानहानीच्या तक्रारीत आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आले होते. २ नोव्हेंबर २०१८ रोजीची तक्रार रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली होती. काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा करणाऱ्या बब्बर यांनी थरूर यांच्या विरोधात ट्रायल कोर्टात फौजदारी तक्रार दाखल केली होती. ऑक्टोबर २०१८ मध्ये शशी थरूर यांनी दावा केला होता की एका आरएसएस नेत्याने पंतप्रधान मोदींची तुलना ‘शिवलिंगावर बसलेल्या विंचू’शी केली होती. या प्रकरणी ट्रायल कोर्टाने जून २०१९ मध्ये थरूर यांना जामीन मंजूर केला होता.

Exit mobile version