आज भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला. देशाच्या ७५ व्या स्वातंत्रदिनानिमित्त त्यांनी देशाच्या एकूण वाटचालीचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी भारताच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज देखील अधोरेखित केली. ‘सबका साथ, सबका विकास सबका विश्वास’ नंतर आता ‘सबका प्रयास’ची गरज आहे असे पंतप्रधानांनी यावेळी भाषणात सांगितले. त्यांनी हा मुद्दा भाषणात विविध ठिकाणी अधोरेखित देखील केला.
आपल्या भाषणाची सुरूवात त्यांनी सर्व स्वातंत्र्यवीरांना नमन करून केली. त्याबरोबरच भारताच्या नागरिकांना आणि लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या अगणित लोकांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
करोना काळ देशासमोर नवनवी आव्हाने घेऊन आला. पण आज भारताने अवलंबित्व संपवले आहे. भारताकडे आज स्वदेशी लस आहे. ५४ कोटीहून अधिक नागरिकांना लस मिळाली आहे. ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्यात आले. जर ही लस नसती तर काय अवस्था झाली असती असा सवाल देखील त्यांनी यावेळी लाल किल्ल्यावरून विचारला. कोरोना काळात शास्त्रज्ञ. डॉक्टर यांनी केलेल्या असामान्य कामगिरीची दखल पंतप्रधानांनी घेतली. या काळात अनेकांना वाचवता आले नाही. कित्येक मुले अनाथ झाली त्याबद्दल पंतप्रधानांनी खंत देखील व्यक्त केली.
आजच्या समारंभाला ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंची उपस्थिती देखील लाभली होती. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात या खेळाडूंचे अभिनंदन केले.
देशाचा विकास करण्यास आता सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी या संपूर्ण भाषणातून अधोरेखित केले. भारताला पूर्णत्वापर्यंत जायचे असल्याचा संकल्प देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
विकास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे असे देखील यावेळी पंतप्रधानांनी सांगितले. ईशान्येकडील राज्यांनी लवकरच रेल्वे सुविधा प्राप्त होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ईशान्येला भारताशी जोडण्याचा इतिहास लिहिला जात आहे. ईशान्येच्या प्रत्येक राज्यात रेल्वेचे जाळे निर्माण होईल. देशाचा कोणताही कोपरा मागास राहणार नाही. असे त्यांनी सांगितले. हिमालय भाग, लेह-लडाख, पूर्वोत्तर भारत आणि कित्येक आदिवासी भाग देखील भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावताना लवकरच दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जम्मू-काश्मीरमध्ये विकासकाम वेगाने सुरू आहे. लडाखही विकासाच्या वाटेवर आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. लडाखमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांचा पाया रचला जात आहे. असे पंतप्रधानांनी सांगितले
त्यांनी गरीबांना दिल्या जाणाऱ्या अन्नाविषयी देखील भाष्य केले. आता गरीबांना मिळणारा तांदूळ हा पौष्टिक दर्जाचा दिला जाईल असेही सांगितले. देशात मोठ्या प्रमाणात वैद्यकिय सुविधा निर्माण होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. गरिबांच्या कल्याणाचा विचार केला जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले. गरिबांपर्यंत विविध योजना पोहोचत आहेत असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
भारताच्या ऑलिम्पिक चमूसोबत राष्ट्रपतींची ‘चाय पे चर्चा’
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
भारतातील चार पाणथळ ठिकाणांचा रामसर यादीत समावेश
फेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची ‘जागा’
रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांचा यापूर्वी देशाच्या इतिहासात कुणीच विचार केला नाही. आम्ही त्यांना बँकिंग सेवेशी जोडत आहोत. स्वनिधी योजना आणि कर्जयोजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. असे देखील पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी ‘हर घर जल’ या योजनेवर केंद्र सरकार काम करीत आहे. साडेचार कोटींहून अधिक कुटुंबांपर्यंत फक्त दोन वर्षांत नळाद्वारे पाणी पोहोचले आहे. उज्ज्वला ते आयुष्मान भारतसारख्या योजनांद्वारे अनेक गरिबांना सरकारी योजनांचा लाभ मिळाला आहे’, असे देशातील जनतेला सांगितले.
गावातील विकासाचा दृष्टीकोन त्यांनी जनतेसमोर मांडला. गावांना रस्ते आणि पाणी यानंतर इंटरनेटने जोडले जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले. गावांमध्ये जमिनींची ड्रोनद्वारे मॅपिंग होत आहे. जल, स्थळ, आकाशक्षेत्रात ऐतिहासिक विकास साध्य होत आहे. स्वामित्व योजनेंतर्गत जमिनींची कागदपत्रे तयार होत आहेत. त्यामुळे गावातील जमिनीवरून होणारे तंटे देखील थांबले असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील महिला बचत गटांचा त्यांनी उल्लेख केला. या गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना जगासमोर आणले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी जनतेला दिली. त्यासाठी सरकार इ- कॉमर्स व्यासपीठ लवकरच तयार करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.
स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारने नवसंकल्प केले आहेत. परिश्रम व पराक्रमांती संकल्पपूर्तीचे लक्ष्य गाठू. सरकारचा अकारण हस्तक्षेप बंद होईल. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ घेऊन आम्ही गरिबांसमोर जाऊ. विकासाबाबतचा असा दृष्टीकोन पंतप्रधानांनी देशातील जनतेसमोर मांडला.
देशातील पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त येणाऱ्या ७५ आठवड्यांत देशातील विविध भागांमध्ये ७५ वंदे भारत गाड्या चालवणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळेला केली.
देशाच्या विकासासाठी उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात वाढ होण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. भारत आता स्वतःच विमानवाहू नौका, गगनयान, लढाऊ विमानाचे उत्पादन करू लागला असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना त्यांनी भारताच्या निर्यातीबद्दल देखील सांगितले. ७ वर्षांपूर्वी ८ बिलीय डॉल मोबाईल आयात केले जात होते मात्र आता भारत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आता निर्यात करू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. भारत ३ बिलियन डॉलर मोबाईल निर्यात करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी भारतीय स्टार्टअपना जागति बाजाराला लक्ष्य करण्याचे आवाहन देखील केले. जागतिक बाजारपेठ काबीज करण्याच्या प्रयत्नात सरकार संपूर्णपणे पाठीशी उभे असल्याचे देखील त्यांनी सांगिले. देशात उद्योगांच्या वाढीसाठी सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप बंद केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी देशातील अनेक जुने अनावश्यक नियम रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्याबरोबच त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणावर देकील भाष्य केले. त्यांनी सांगितले की या धोरणात भाषेचा अडसर राहणार नाही अशी योजना करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत खेळांनादेखील महत्त्व देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी देशातील मुलींचा विविध क्षेत्रातील दबदबा देखील वाढत असल्याचे सांगितले. त्याबरोबरच देशातील सर्व सैनिकी शाळा मुलींसाठी खुल्या करत असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.
देशाच्या उर्जा क्षेत्रावर भाष्य करताना भारताला उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. त्यासाठी त्यांनी नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा देखील केली. भारताची सौर उर्जा क्षेत्रातील घोडदौड देखील त्यांनी देशासमोर मांडली. देश पर्यावरणीय क्षेत्रात देखील उत्तम कामगिरी कर असल्याचे त्यांनी सांगितले. जी २० देशांमध्ये पर्यावरणीय लक्ष्य गाठण्याच्या दिशेने प्रवास करत असलेला भारत हा एकमेव देश असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
भारताने विविध समस्या गेल्या काही वर्षात सोडवल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यात कलम ३७० पासून ते राम मंदिरापर्यंतच्या विविध कामगिरींचा त्यांनी उल्लेख केला. त्याबरोबरच देशाची परकीय गंगाजळी देखील सर्वोच्च पातळीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
आज देशाच्या ७५ व्या दिनानिमित्त मी जे संकल्प म्हणून सांगत आहे ते आणखी २५ वर्षांनी तेव्हाच्या पंतप्रधानांसाठी देशाची उपलब्धी ठरले असतील असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला. यावेळी त्यांनी योगी अरविंदांचे स्मरण देखील केले आणि देशाच्या उज्ज्वल भविषयाचा विचार अरविंदांना मांडला असल्याचे देकील ते म्हणाले. भाषणाच्या अंती त्यांनी तरूणांसाठी एका कवितेचे वाचन देखील केले, आणि देशातील तरूणांना प्रेरणा दिली.