यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेल्या पत्रकार बाळ बोठे यांना अहमदनगर पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. या हत्येच्या प्रकरणानंतर बोठे साडेतीन महिने फरार होता.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी ३० नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची गाडी अडवून हत्या करण्यात आली होती. अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात गाडी अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. यावेळी गाडीत बसलेल्या रुणाल पाल याने मारेकऱ्यांना पाहिले होते. त्याच्या सहाय्याने पोलिसांनी जोरदार कारवाई करत ५ आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. मात्र त्यांच्या जबाबात बाळ बोठे हे यामागचे सुत्रधार असल्याचे समोर आले होते. पत्रकार बाळ बोठे यांनी सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली असल्याचे समजत होते.
हे ही वाचा:
तुम्हाला सगळे हिशेब द्यावेच लागतील- किरीट सोमय्या
आरोपींनी दिलेल्या जबाबानंतर सुद्धा पोलिस त्याला अटक करून शकले नव्हते. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात देखील हा मुद्दा उचलला होता. तीन महिने झाले तरी, प्रमुख आरोपी न सापडल्याने अखेर रेखा जरे यांच्या कुटुंबियांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला होता. परंतु तीन महिने फरारी राहिल्यानंतर अहमदनगर पोलिसांनी बाळ बोठे याला हैदराबाद येथे पहाटे बेड्या ठोकल्या.
या प्रकरणातील पाचही आरोपींविरुध्द पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. बाळ बोठे यांच्या विरोधात देखील स्टँडिंग वॉरंट जारी करण्यात आले होते. त्याविरोधात बाळ बोठेने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी बाळ बोठे यांना विरोधात निर्णय दिल्याने पोलिसांचा मार्ग मोकळा झाला होता.