रफिक हुसैन भटुक या गोध्रा जळितकांडातील प्रमुख आरोपीला तब्बल १९ वर्षांनी अटक करण्यात आली आहे. गोध्र्याला १९ वर्षांपूर्वी साबरमती एक्सप्रेसचे डबे जाळण्यात आले होते, ज्यात सुमारे ५९ कारसेवकांचा जळून मृत्यु झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रफिकला गोध्रा शहरातूनच अटक करण्यात आली.
हे ही वाचा:
पंचमहाल पोलिस अधिक्षक लीना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ५१ वर्षीय भटुक हा गोध्रा स्थानकात मजूर म्हणून काम करत होता. तो या कटाच्या मुख्य समुहापैकी एक होता. तो गेली १९ वर्षे फरार होता. गोध्रा पोलिसांनी रेल्वे स्थानकाजवळील सिग्नल फालिया या भागात मारलेल्या एका छाप्यात रफिक पकडला गेला आहे. भटुक हा या कटाच्या प्रमुख टोळीपैकी होता. त्यानेच जमावाला गाडी पेटवण्यासाठी भडकवले, व त्यासाठी पेट्रोलची सोयही करून दिली होती. त्यानंतर तो दिल्लीला पळून गेला आणि दुसऱ्या नावाने राहात होता. मात्र त्याच्यावर दंगल भडकवणे आणि हत्या करण्याचे आरोप होते.
दिल्लीला पळून गेल्यानंतर भटुक बराच काळ दिल्लीतच होता. तिथे तो रेल्वे स्थानकावर आणि एका बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणूनच काम करत होता. त्याने आपले घरदार देखील विकले होते. मात्र नुकतंच त्याने सुलता फालिया इथून आपल्या जुन्या जागी सिग्नल फालिया या ठिकाणी परिवाराचे स्थलांतर केले. पोलिसांना भटुक आपल्या परिवाराला भेटत असल्याबद्दल कळत होते, परंतु त्याला पकडण्यात यश आले नव्हते. यावेळेस मात्र पोलिसांना त्याला बेड्या ठोकण्यात यश आले. पुढील चौकशीसाठी त्याला गोध्रा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तीन अरोपी सलिम इब्राहिम बदाम उर्फ सलिम पानवाला, शौकत चरखा आणि अब्दुलमाजीद युसुफ मीठा अजून फरार आहेत. ते पाकिस्तानात पळून गेले असावेत असा पोलिसांचा विश्वास आहे.
गोध्रा येथे लहान मुले, स्त्रिया मिळून ५९ कारसेवकांना जाळून मारण्यात आले होते. २७ फेब्रुवारी २००२ रोजी घडलेल्या या घटनेनंतर गुजरातमध्ये दंगलींचा भडका उडाला.