चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच

उद्धव ठाकरे यांचा ऑनलाइन संवाद

चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज संवाद साधला आहे. यावेळी ठाकरे गटाची पुढील रणनीती काय असणार हे जनतेला सांगणं अपेक्षित असताना त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर टीका केली. गद्दार, खोकासूर, मिंदे गट, काळजात वार करणारी कट्यार अशा शब्दात शिंदे गटाला आणि भाजपाला टोमणे मारले.

यापूर्वीही अनेकदा कठीण वेळी संवाद साधला. मुख्यमंत्री पद मलाच हवं असं म्हणून काहींनी शिवसेनेशी गद्दारी केली. मुख्यमंत्री पदाचा त्याग केला, तेव्हा प्रत्येक वेळी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी सगळं सहन केलं पण आता सगळं अति होतं आहे. आता स्वतः शिवसेना प्रमुख व्हायला निघाले आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना लगावला.

शिवसेनाचा पारंपारिक दसरा मेळावा पार पडला पण तो होऊ नये म्हणून खोकेसुराने प्रयत्न केला होता. त्यावेळी न्याय देवतेने योग्य न्याय दिला आणि अभूतपूर्व असा दसरा मेळावा पार पडला. स्वतःची मीठभाकरी घेऊन शिवसैनिक लांबून आले होते. तुम्ही मानता म्हणून आम्ही आहोत. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मला किंमत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यानंतर उद्धव ठाकरेंनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली तेव्हपासूनचा थोडक्यात इतिहास सांगितला. प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना संघटनेचे नाव शिवसेना असे सांगितले होते. त्यावेळी शिवसेनेसोबत मोठी अशी माणसं कोणी नव्हती पण सामान्य माणूस मात्र सोबत होता. ठाणे पालिकेत शिवसेनेला पाहिलं यश मिळालं. पुढे मुंबई महापालिकेत यश आलं. या प्रवासात अनेक संकट आली. पण शिवसैनिक लढले, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगाने जो निर्णय नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणजे ४० डोक्याच्या रावणाने श्रीरामाचा हा धनुष्यबाण गोठवला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली. त्यांनी आपल्या आईच्या काळजात कट्यार घुसवली आहे. मराठी माणसाची एकजूट मोडायला निघाले आहेत. त्याचा त्यांना आनंद होत असेलच पण जास्त आनंद होत असेल तो त्यांच्या मागे असणाऱ्या महाशक्तीला, असा टोला उद्धव ठाकरेंनी नाव न घेता भाजपाला लगावला आहे.

शिवसेना आणि तुमचा संबंध काय आहे? माझ्या आजोबांनी नाव दिलं आणि वडिलांनी रुजवलं ते मी पुढे नेतोय. संकटातसुद्धा संधी असते आणि ती मी शोधणार त्या संधीचं सोनं करून दाखवणार. आज निष्ठावान माझ्या सोबत आहेत. तुम्हाला ज्यांनी मोठं केलं त्यांच्या विरोधातचं आज तुम्ही उभे आहात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असं तुम्ही म्हणता पण काँग्रेसने कधी शिवसेना बंद पाडण्याचा प्रयत्न केला नाही. पण तुम्ही तेच करत आहात. भाजपा मिंदे गटाला कसा वापरून घेतोय हे त्यांना कळत नाही आहे. मी अजूनही दमलेलो नाही. माझ्यात आत्मविश्वास आहे. पण बाळासाहेबांचं नाव न वापरता त्यांनी मैदानात उतरावं असं आव्हान उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटाला केलं आहे.

हे ही वाचा:

नाशिक अपघातप्रकरणी ट्रकचालकाला अटक

बालविवाहाचे प्रमाण झारखंडमध्ये अधिक

शरद पवार म्हणतात, बॉलिवूडला टॉप पोझिशनला पोहोचवण्यात मुस्लिमांचं मोठं योगदान

उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर

त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या मधील एक चिन्हं आणि (शिवसेना) बाळसाहेब ठाकरे, (शिवसेना) बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि (शिवसेना) उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांपैकी एक नाव देण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे.

Exit mobile version