उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर, आम्ही कोणतंही सेलेब्रेशन केलेलं नाही, असं स्पष्टीकरण शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात नेहमीच आदर आहे, असंही केसरकर म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे, बंडखोर आमदार आणि शिवसेना यांच्यात पडलेल्या अंतराला फक्त संजय राऊत जबाबदार आहेत, असा आरोप केसरकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला तरीही त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल आमच्या मनात नेहमीच आदर आहे. मात्र संजय राऊत हे जेवढे कमी बोलतील हे पक्षासाठी फायद्याचं असेल, असे केसरकर म्हणाले आहेत.
उद्धव ठाकेरेंनी मविआची साथ सोडली असती तर, आम्ही चर्चेला आलो असतो. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांची साथ सोडली नाही. तसेच शिवसेनेवर कुणीही दावा केलेला नसून, आमची लढाई ही तत्त्वासाठी आहे. जनमताचा कौल ज्यांना होता त्यांच्याशीच आता युती झाल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पाठीत खंजीर खूपसल्याची भाषा करणे चुकीचं आहे, असे केसरकर म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
धक्कदायक! कांदिवलीत चार रक्तरंजित मृतदेह आढळले
उदयपूर मधील कन्हैयालालसाठी २४ तासात जमले १ कोटी
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर
कुलगाममध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
पुढे ते म्हणाले, सत्तेत वाटा घेण्यासाठी भाजपासोबत जात नाही आहोत. जनतेसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही भाजपासोबत गेलो आहोत. तसेच केंद्र आणि राज्यात समन्वय आवश्यक आहे त्यासाठी आम्ही भाजपासोबत जाणार आहोत. एकनाथ शिंदे हे एकवचनी असून, ते सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतील. त्यामुळे आम्ही शिंदे साहेबांसोबत असू, असाही केसरकर म्हणाले आहेत.