केंद्रीय मंत्री मंडळाने पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे. जावडेकर यांनी ही माहिती, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री वी नारायणसामी यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी केली आहे.
हे ही वाचा:
माध्यमांशी बोलताना जावडेकरांनी सांगितले, की पुदुच्चेरीमध्ये सरकार स्थापनेसाठी कोणीही दावा केलेला नाही. जावडेकरांनी सांगितले की, पुदुच्चेरीमधील सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राजिनामा दिला होता. त्यानंतर कोणीही सत्तास्थापनेसाठी दावा केलेला नाही. त्यामुळे लेफ्ट. गव्हर्नरांनी विधानसभा विसर्जीत करण्याची शिफारस केली आहे.
आज केंद्रीय मंत्रीमंडळाने या शिफारीसीवर मान्यतेची मोहोर उमटवली आहे, आता राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर विधानसभेचे विसर्जन करण्यात येईल.
दिनांक २३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी वी नारायणसामी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा स्वीकारला. वी नारायणसामी आणि त्यांच्या मंत्रीमंडळाने पुदुच्चेरी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर राजिनामा दिला होता. पुदुच्चेरीतील ३३ सदस्यीय विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि द्रविड मुन्नेत्र कजघमच्या (डीएमके) एका आमदाराने राजीनामा दिल्यानंतर सरकार अल्पमतात गेल्याने कोसळले. विधानसभेचे अध्यक्ष वी पी सिवाकोलूंधू यांनी घोषित केले की, मुख्यमंत्री त्यांचे बहुमत सिद्ध करू शकत नाहीत आणि विधानसभा अनिर्णीत काळासाठी विसर्जित केली.
या केंद्र शासित प्रदेशात याच वर्षी निवडणुका होणे अपेक्षित होते. निवडणुकांच्या तारखा अजून घोषित झालेल्या नाहीत.