“जळगाव वसतिगृह प्रकरणावर सभागृहात बोलत असताना, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी “या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे” असा आरोप सरकारवर केला.
जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
हे ही वाचा:
महिला अत्याचार प्रकरणी, पोलिसांचे मंत्र्यांच्या पावलावर पाऊल
या विषयी सभागृहात बोलत असताना गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणात लवकरच कारवाई केली जाईल, असे ‘आश्वासन’ दिले. गृहमंत्र्यांच्या या उत्तरावर सुधीर मुनगंटीवार यांना राग आला आणि त्यांनी सरकारवर हल्ला केला. “या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. मी संविधानाचा सन्मान करणारा माणूस आहे. पण राज्यात जर आज आमच्या आया बहिणीच सुरक्षित नसतील तर हीच वेळ येईल.” अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर हल्ला केला.