नरेंद्र मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला; काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार

सत्ता स्थापनेचा दावाही करणार

नरेंद्र मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला; काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा आपल्या हाती घेणार आहेत. निकालानंतर एनडीएने सत्ता स्थापन करण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. येत्या ८ जून किंवा ९ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यासाठी एनडीएची बैठक दिल्लीत पार पडत आहे. दरम्यान दिल्लीतही मोठ्या हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींचा राजीनामा स्वीकारला आहे. १७ व्या लोकसभेची मुदत आज संपली आहे. तसेच सत्ता स्थापनेचा दावाही नरेंद्र मोदी करू शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा मंजूर केला असून मोदी आतापासून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

२०१४ नंतर भाजपा यंदाच्या निवडणुकीत २७२ च्या बहुमतापासून मागे पडलं आहे. त्यामुळे भाजपाला एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या अन्य पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. भाजपाने २४० जागा जिंकल्या आहेत. तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) १६, जेडीयू १२, शिवसेना सात, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) यांनी पाच जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे हे घटक पक्ष सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतील.

हे ही वाचा:

भाजपाच्या नेतृत्वात एनडीएच्या विजयानंतर नरेंद्र मोदींवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदी ९ जूनला तिसऱ्यांदा शपथ घेण्याची शक्यता

भाजपला आत्मचिंतन करायला लावणारे निकाल!

‘चांगल्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा’

अशातच शुक्रवारी, ७ जून रोजी दुपारी अडीच वाजता संसद भवनात एनडीएच्या खासदारांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ जून रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात.

Exit mobile version