महापालिकेच्या माध्यमातून मुंबईला कुरतडणाऱ्या ‘उंदरांचा’ बंदोबस्त करावा लागणार

महापालिकेच्या माध्यमातून मुंबईला कुरतडणाऱ्या ‘उंदरांचा’ बंदोबस्त करावा लागणार

‘महापालिकेच्या माध्यमातून मुंबईला कुरतडणाऱ्या ‘उंदरांचा’ लवकरच बंदोबस्त करावा लागणार आहे’ असा घणाघातविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. प्रवीण दरेकर यांनी बुधवार, २३ जून रोजी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत मुंबई महापालिकेच्या भोंगळ कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

बेशुद्ध अवस्थेतील एका रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी राजावाडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात घडला होता. या पार्शवभूमीवरच दरेकर यांनी राजावाडी रुग्णालयाचा दौरा करत या रुग्णाची भेट घेतली. घडलेला प्रकार हा मुंबई महापालिकेची मान शरमेने खाली घालणारा आहे असे मत दरेकरांनी मांडले.

हे ही वाचा:

वसई-विरारमधील बांधकाम माफियांना कुणाचा आशीर्वाद?

ओबीसींच्या हक्कासाठी २६ जूनला भाजपाचा चक्का जाम

मुख्यमंत्र्यांची आधी संमती, मग स्थगिती! आव्हाडांचा दावा

अरेरे! ७ वर्षांच्या मुलासह मातेने घेतली १२व्या मजल्यावरून उडी

राजवाडीच्या आधी सायन हॉस्पिटलमध्येही अंदाजे एक दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती. कोविडच्या निमित्ताने महापालिका ही जगातील सर्वोत्तम महापालिका अशी स्वतःची पाठ थोपटून घेत असताना जर उंदीर जरा रुग्णाचे डोळे कुरतडल्याचा प्रकार होत असेल तर हे गंभीर आहे असे दरेकर म्हणाले. तर यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या सॅनिटायझेशनवरही सवाल उपस्थित केले. सॅनिटायझेशन नीट झाले नव्हते का? ते करणारे अधिकारी कोण होते? या साऱ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

आगामी विधिमंडळ अधिवेशनात हा विषय आपण लावून धरणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले. तर आपल्या या रुग्णालय भेटीचे फोटो ट्विट करत त्यांनी मुंबई महापालिकेला टोला हाणला आहे. मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात,महापौरांना मुंबई महापालिकेकडे लक्ष द्यायला वेळ मिळेना! इथे सगळेच ‘राम भरोसे’ असल्याचे टीकास्त्र दरेकर यांनी डागले आहे. तर “महापालिकेच्या माध्यमातून मुंबईला कुरतडणाऱ्या ‘उंदरांचा’ लवकरच बंदोबस्त करावा लागणार आहे.” अशी चपराक दरेकर यांनी लगावली आहे.

Exit mobile version