विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनिल देशमुख यांच्या जावयाला सीबीआयने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा दावा करणाऱ्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “नारायण राणे साहेबांना अटक वाॅरंट न दाखवता तुम्ही अटक केली. त्यावेळी कुठे गेला होता कायदा?” असा सवाल दरेकर यांनी विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जावई गौरव चतुर्वेदी यांना बुधवार, १ सप्टेंबर रोजी सीबीआयने ताब्यात घेतले. गौरव चतुर्वेदी यांना चौकशीसाठी वरळी येथून ताब्यात घेण्यात आले. तर चौकशी झाल्यावर त्याला सोडूनही दिले गेले. सीबीआयने अनिल देशमुख यांना क्लिन चिट दिल्याचा खोटा अहवाल प्रसिद्ध झाल्या प्रकरणी चतुर्वेदी यांची चौकशी झाल्याचे म्हटले जात आहे. पण या प्रकरणावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे.
हे ही वाचा:
‘क्लिन चीट’ रिपोर्टसाठी सीबीआय अधिकाऱ्याला देण्यात आली लाच!
सीएनएनला भारत सरकारची कृतीतून चपराक
अनिल देशमुखांचा जावई सीबीआयच्या ताब्यात
फुटीरतावादी काश्मीरी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे निधन
गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी हा आरोप केला आहे. तर अनिल देशमुख यांच्या जावया सोबत नेमके काय घडले? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
राष्ट्रवादीच्या याच आरोपांवरून दरेकर यांनी पलटवार केला आहे. “अनिल देशमुखांच्या जावयाला कायदेशीररित्या चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कुठलीही माहिती नातेवाईकांना दिली नाही, असा आरोप नवाब मलिक तुम्ही करता…पण ज्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे साहेबांना अटक वॉरंट न दाखवता तुम्ही अटक केली, त्यावेळी कुठे गेला होता कायदा? आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट…” असे ट्विट करत दरेकरांनी नवाब मलिकांना लक्ष्य केले आहे.
पण ज्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे साहेबांना अटक वॉरंट न दाखवता तुम्ही अटक केली, त्यावेळी कुठे गेला होता कायदा? @nawabmalikncp जी, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट….
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 1, 2021