‘आधी चोऱ्या करायच्या आणि नंतर बहाणे करायचे’ दरेकरांचा मलिकांवर पलटवार

‘आधी चोऱ्या करायच्या आणि नंतर बहाणे करायचे’ दरेकरांचा मलिकांवर पलटवार

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला आहे. नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना दरेकर यांनी उत्तर दिले आहे. नवाब मलिक यांचे आरोप म्हणजे आधी चोऱ्या आणि आता बहाणे अशी परिस्थिती असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवार, ७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. ‘महाराष्ट्रातील आयएएस, आयपीएस अधिकारी सरकारवर आरोप करण्याआधी फडणवीसांना भेटतात’ असा दावा मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या दाव्याला दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भातील सविस्तर पोस्ट भाजप महाराष्ट्राच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर टाकण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेली आहे’

चौकडी विकत होती बनावट ‘ब्रँडेड’ घड्याळे

केंद्रीय मंत्र्याला अटक करतात; पण माजी गृहमंत्री मात्र सापडत नाही

बंदीचा उत्सव; दर्शनाला बंदी, जमावबंदी, संचारबंदी

काय म्हणाले दरेकर?
‘भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आयपीएस अधिकार्‍यांसोबत बैठकी झाल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जातेय, हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे ‘आधी चोर्‍या-आता बहाणे’ असा प्रकार आहे, अशा शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे.

स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, कोरोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. रोज सकाळी मिडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे. तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? का तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार आहेत? त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘आधी चोर्‍या-नंतर बहाणे’ अशाच वर्गवारीत मोडणारा आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

असेच प्रकार बेळगावमधील भाजपाच्या विजयानंतर काही नेते करीत आहेत. मराठी माणसाचा पराभव वगैरे बिरूद ते लावतील. पण, भाजपाच्या विजयी ३६ नगरसेवकांपैकी २३ मराठी आहेत, हे तुम्हाला कधीही सांगणार नाहीत. निव्वळ भावनात्मक विषय करून सामान्य जनतेची फसवणूक तुम्ही करू शकत नाही. निवडणूक निकालावर शंका उपस्थित करून शिवसेना आता काँग्रेसच्या अधिक जवळ गेली आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारी पूर्वी एकमेव गलितगात्र काँग्रेस होती. शिवसेनेलाही त्याच रांगेत जाऊन बसण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version