महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. राज्यात ज्यांचे सरकार आहे त्याच पक्षाचे कार्यकर्ते कायदा हातात घेताना दिसत आहेत. सरकारच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या सहकार्याने सरकार पुरस्कृत गुंडगिरी सुरू असून ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना आहे असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. भाजपा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष असून मात्र, समोरून आम्हांला डिवचण्याचा प्रयत्न केला तर भाजपा शांत बसणार नाही असा गर्भित इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
प्रविण दरेकर म्हणाले, मोहित कंबोज रस्त्यावरुन जात असताना त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. नवनीत राणा यांच्या घरापर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जाण्याची मुभा दिली. चेंबूर, दहिसर, कांदिवली, गिरगावात झालेल्या पोलखोल अभियानाच्या सभेत दगडफेक, मोडतोड करून शिवसेनेचे कार्यकर्ते दहशत माजवत आहेत. भाजपाने दबाव आणल्यानंतर गुन्हे दाखल होतात मात्र अजूनही आरोपी फरार आहेत. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्याच पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या समोर गुंडगिरी करत आहेत. महाराष्ट्रात पोलिसांच्या समोर एवढी दहशत कधीच झाली नव्हती. या गुंडगिरीचे समर्थन शिवसेनेचे नेते करत आहेत. अश्या प्रकारचे समर्थन करणार असाल तर भाजपाचे कार्यकर्ते हात बांधून बसणार नाहीत असेही दरेकर म्हणाले.
भाजपा कायद्याला, लोकशाहीला माणणारा पक्ष आहे. लोकशाही मार्गाने जे काही करायचे ते करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही मुंबई पोलिसांना निवेदन देणार आहोत. शिवसेनेचे कार्यकर्ते दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने तातडीने याला आवर घालावा. हे सगळ घडत असताना राज्याचे मुख्यमंत्री मुग गिळून गप्प आहेत. यापूर्वी राज्यात असे चित्र कधीच नव्हते असे आमदार श्री. दरेकर म्हणाले. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम महाविकास आघाडीच्या सरकारने केले आहे अशीही टीका दरेकर यांनी केली.
हे ही वाचा:
‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’
‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’
‘मातोश्री मंदिर आहे तर, आम्हाला का रोखले जात आहे’
आमदार आशिष शेलार म्हणाले, परवानगी घेऊन लोकशाही मार्गाने पोलखोल अभियान सुरू आहे. दंगा घालणं, दहशत पसरवणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. या झुंडशाहीला पोलिसांनी मर्यादा घालाव्यात. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. लोकशाहीला लोकशाहीने आणि ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर देऊ. राज्यातील पोलीस प्रशासन पक्षपातीपणे वागत आहे राज्यात तक्रारदार, साक्षीदार, पंच सुरक्षित नाहीत. त्यामुळे या गोष्टी जनतेच्या न्यायालयात घेऊन जाऊ आणि लोकशाही मार्गाने न्याय मिळवू असेही आमदार शेलार म्हणाले.
मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले, महाराष्ट्रात बंगालपेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध आठ घटनांमधील दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही. मुंबईकरांच्या टॅक्सच्या पैश्याची खुलेआम लूट सुरू आहे. मुंबईच्या जनतेने याबाबत गांभीर्याने विचार करावा असे आवाहन आमदार लोढा यांनी केले. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर, आमदार योगेश सागर, आमदार अमित साटम, आमदार पराग शहा, आमदार पराग अळवणी, आमदार मनीषा चौधरी, आमदार कॅप्टन तमिळ सेलवन, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार सुनील राणे, मोहित भारतीय उपस्थित होते.