पुन्हा एकदा अपघात झाल्यानंतर प्रवीण दरेकरांचा सवाल
भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी जोगेश्वरी -विक्रोळी लिंक रोडवर एनएसजी कॅम्पजवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये प्रवीण दरेकर सुदैवाने बचावले आहेत. पण त्यांच्या गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. या महिनाभरात प्रवीण दरेकरांच्या गाडीला तिस-यांदा अपघात झाला आहे.
या महिन्याभरात दरेकर यांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात झाला असून तिन्ही अपघात एकसारखेच आहेत. तिन्ही अपघातात बाईकस्वार अचानक पुढे आल्याने अपघात झाला आहे. त्यामुळे दरेकरांसह त्यांच्या सहका-यांना देखील या अपघाताबद्दल संशय निर्माण केला जात आहे. याप्रकरणी दरेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहेत.
प्रवीण दरेकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी विरोधी पक्षनेता असल्याने मला राज्यभर फिरावे लागते. पण अशा पध्दतीने सतत अपघात होत असल्याने माझ्या मनात शंका येत आहे. तिन्ही वेळी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांपासून ही अपघाताची मालिका सुरू असून आतापर्यंत तीन वेळा असे झाले आहे. त्यामुळे मी चौकशी करणार आहे.”
हे ही वाचा:
तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?
‘मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल कॅग ऑडिट करण्याची गरज’
कवठेमहांकाळची निवडणूक बनावट मतदारांमुळे वादात
उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात
कामानिमित्त मालेगावला गेले असता त्यांचा पहिला अपघात झाला होता. तर दुसरा अपघात पुणे-बंगळूर महामार्गावरील परगाव-खंडाळा येथे अपघात झाला होता. सातारा जिल्ह्याच्या हद्दीत हा अपघात घडला होता. त्यावेळी दरेकर सातारा दौऱ्यावर होते. हे तिन्ही अपघात सारखेच आहेत, अचानक समोरून दुचाकीस्वार येतो आणि अपघात होत आहे. त्यामुळे या अपघाताबद्दल संशय निर्माण केला जात आहे.