काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार प्रतिभा धानोरकरांचा गौप्यस्फोट

दिवंगत खासदार बाळू धानोरकरांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार प्रतिभा धानोरकरांचा गौप्यस्फोट

एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असताना दुसरीकडे राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटपाचा मुद्दा मार्गी लागलेला नसताना आता काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नीने याबाबत वाच्यता केली आहे. काँग्रेसमधील गटबाजीमुळे आपल्या पतीचा जीव गेला, असा आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.

पक्षांतर्गत विरोधामुळेच पती खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक मतदारास माहिती आहे, खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे, असे प्रतिभा धानोरकर यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना म्हटले. खासदार गेले तेव्हापासून पक्षातीलच काही लोक विरोध करत आहेत. या विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव त्यांनी घेतला. पक्षातील लोकांनी खासदार साहेबांना मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आता ते माझ्या मागे लागलेत. पण एक जीव गेला. दुसरा जीव मी जाऊ देणार नाही, याची काळजी मी घेणार आहे, असा दावा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.

हे ही वाचा..

देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक

मविआ सरकार म्हणजे खोडा-काडी सरकार!

“उबाठाच्या बाळराजांना सांगणं आहे, जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो”

“खासदार साहेब गेल्यापासून आठ ते नऊ महिन्यांपासून जे लोक माझा सर्वाधिक विरोध करीत आहेत, तेच लोक मी भाजपात जाणार अशा चुकीच्या अफवा पसरवीत आहेत. त्यासाठी माध्यमांना पॅकेज देऊन चुकीच्या बातम्या पसरवीत आहेत. त्यांनी अशा कितीही अफवा पसरविल्या तरी त्याला मी घाबरणारी नाही. मी काँग्रेसची आहे, मी काँग्रेसच्या तिकिटावरच उमेदवारी लढवणार आहे,” असा इशारा प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे. दरम्यान प्रतिभा धानोरकर यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही त्यामुळे त्या नेमक्या कोणाबद्दल बोलत आहेत याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच चंद्रपूर ही आपल्या हक्काची जागा आहे, ती सोडणार नाही, असे स्पष्ट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनाही सांगितल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version