अखेर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस प्रवेशाचा विचार गुंडाळला!

अखेर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस प्रवेशाचा विचार गुंडाळला!

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात अखेर नकार कळविला आहे. त्यांनी आपल्या ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

प्रशांत किशोर हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता गेले काही दिवस व्यक्त केली जात होती. मात्र गेल्या काही बैठकांनंतरही त्यातून कोणताही ठोस निर्णय होत नसल्यामुळे अखेर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाहीत अशी शक्यता वर्तविली जाऊ लागली. अखेर मंगळवारी त्यांनी ट्विट करून आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे कळविले. त्यांच्या अटी शर्ती मान्य न झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.

ते म्हणाले की, मी काँग्रेसने निवडणुकांसाठी दिलेल्या जबाबदारी स्वीकारण्याची ऑफर स्वीकारलेली नाही. माझ्या मते काँग्रेसला माझ्यापेक्षा नेतृत्वाची गरज आहे. शिवाय, संघटनात्मक समस्यांचे निवारण करण्यासाठी सामुहिक इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी काही आमूलाग्र बदलांचीही गरज आहे.

काँग्रेसने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले की, प्रशांत किशोर यांनी आपले योजनेचे सादरीकरण केल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षांनी २०२४साठी एक कृती गटाची स्थापना केली. आम्ही प्रशांत किशोर यांना म्हटले की, त्यांनी या गटात सहभागी व्हावे आणि त्यातली महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी. त्यावर त्यांनी नकार दिला. त्यांनी ज्या सूचना केल्या त्याचे आम्ही स्वागत करतो.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशमध्ये १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज केला कमी

वकील गुणरत्न सदावर्तेंना जामिन! अटकेपासूनही संरक्षण

नवनीत राणांच्या आरोपांना उत्तर द्यायला सरसावले मुंबई पोलिस आयुक्त

संजय राऊत यांच्या विरोधात नागपूरमध्ये तक्रार

 

गेल्या महिन्यात किशोर यांनी काँग्रेससह तीनवेळा बैठका केल्या. पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्याशी ते बोलले. त्यांनी आपल्या मनातील योजनांचे सादरीकरण केले. पण प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाला काँग्रेसमधील अनेकांचा विरोध असल्याचेही समोर आले होते. पण त्यांचे संबंध तृणमूलच्या ममता बॅनर्जींसोबत तसेच आंध्रमधील जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत असल्याने त्यांना आपल्यात सामावून घेण्याची काँग्रेसची तयारी नव्हती. प्रशांत किशोर यांना पक्षप्रवेशाबरोबरच मुक्तपणे आपले काम करण्याची मुभा हवी होती. ती देण्यास काँग्रेसमधील नेत्यांचा विरोध होता. त्यात प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंग यांचा समावेश होता.

Exit mobile version