जनसुराज्य पदयात्रेला निघालेले निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठे आव्हान दिले आहे. ‘जर त्यांच्यात हिंमत असेल तर जाहीरपणे सांगा की, लालू यादव आणि तेजस्वी यादव हे भ्रष्टाचारी नाहीत. त्यांचे कोणत्याही प्रकारच्या भ्रष्ट कारभाराशी देणेघेणे नाही. केवळ राजकीय बदला घेण्यासाठी त्यांना त्रास दिला जात आहे. मात्र ते असे कधीच जाहीरपणे सांगणार नाहीत. म्हणूनच त्यांना सीबीआय किंवा ईडीची भीती वाटत नाही,’ अशी टीका केली आहे.
पदयात्रेदरम्यान पत्रकारांनी त्यांना राष्ट्रीय जनता दलाचे खासदार यांच्या घरावर पडलेल्या इन्कम टॅक्सच्या छाप्याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि नितीश कुमार यांच्यावर टीका केली. ‘राजदची माणसे ओरडून ओरडून सांगत आहेत की, आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही. हीच बाब नितीश कुमार यांनीही सांगितली पाहिजे. कारण दोघे मिळून सरकार चालवत आहेत. परंतु नितीश कुमार असे बोलत नाहीत. बिहारचे मुख्यमंत्री मनात काय विचार करतात, हेच यात दिसून येते. नितीश कुमार यांना लालू किंवा तेजस्वी यादव यांच्या पक्षाबद्दल बिलकुल प्रेम नाही,’ असे विधान प्रशांत किशोर यांनी केले.
‘महाआघाडी बनवण्याचे आणि लालूंच्या राष्ट्रीय जनता दलासोबत जाण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे सन २०२४मध्ये लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर केंद्रात पुन्हा सत्तेवर आलेल्या भाजपने नितीश कुमार यांना बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवले असते आणि स्वतःच्या पक्षातील उमेदवाराला मुख्यमंत्री केले असेत. यावर त्यांनी हा तोडगा काढला आहे. त्यांनी विचार केला की, भाजपने काढण्याआधी आपणच महाआघाडी स्थापन करू म्हणजे २०२५ पर्यंत मुख्यमंत्रिपदावर राहता येईल.
हे ही वाचा:
जयपूरमधील १०० खासगी लॉकरमध्ये ५०० कोटी आणि ५० किलो सोने
इतिहास घडणार; छत्तीसगडमध्ये ‘बुलेट’वर ‘बॅलेट’चे यश
मणिपूर विद्यार्थी हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाइंडला पुण्यातून अटक
इस्रायलकडून गाझामध्ये छापे; ‘ही तर केवळ सुरुवात’ नेतान्याहू यांचा इशारा
दुसरे कारण म्हणजे २०२५नंतर ते स्वतःच मुख्यमंत्री होणार नाहीत. ते हे पद अशा व्यक्तीला सोपवतील, जी व्यक्ती या पदासाठी अयोग्य असेल. त्यामुळे यापेक्षा आधीचे नितीश कुमारांचे सरकार बरे होते, असे लोक म्हणतील,’ असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.