पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून भाजपाने चार राज्यातील सत्ता राखलेली आहे. तर आता या चारही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा संधी देत असल्याचे दिसत आहे. गोवा आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाने अनुक्रमे प्रमोद सावंत आणि पुष्कर सिंह धामी यांना विधिमंडळ नेता म्हणून घोषित केले आहे. या घोषणेनंतर हे दोन्ही युवा नेते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.
निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच गोव्याच्या मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार याची चर्चा रंगली होती. प्रमोद सावंत यांच्या सोबतच विश्वजित राणे यांचे देखील नाव चर्चेत होते. पण थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रमोद सामंत यांच्याकडे गोव्याची धुरा सोपवल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्याच्या विधिमंडळ नेता निवडीसाठी आज भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, गोवा भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी रवी इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीतच सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे आता दुसऱ्यांदा प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
हे ही वाचा:
भाजपाला मतदान केल्यामुळे महिलेला तिहेरी तलाकची धमकी
तेलंगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध! दगडफेकीनंतर जमावबंदी लागू
… म्हणून इम्रान खान यांनी केलं भारताचं कौतुक
‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, मात्र लाभ घेते पवार सरकार’
तर दुसरीकडे उत्तराखंड येथे पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या बाबतची घोषणा केली आहे. पण पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केल्यामुळे उत्तराखंडमध्ये पोटनिवडणूक पाहायला मिळणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत धामी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण असे असले तरीही त्यांचा चेहरा पुढे करूनच भाजपाने देवभूमीतील सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. संविधानिक तरतुदीनुसार शपथ घेतल्यापासून पुढल्या सहा महिन्यात धामी यांना आमदार म्हणून निवडून येणे बंधनकारक असणार आहे.