“काँग्रेस आणि कम्युनिस्टांना देश अशांत ठेवायचा आहे आणि देशात दंगल भडकवायची आहे.” “राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आंदोलनाचे फक्त समर्थन नाही करत तर त्यांना उचकवतो” असे गंभीर स्वरूपाचे आरोप केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या हिंसाचारा पश्चात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दिल्लीत झालेल्या हिंसाराचा ठपका काँग्रेसवर ठेवताना नागरिकत्व कायद्याच्या वेळीही काँग्रेस पक्षाने असेच लोकांना उचकवले होते असा घणाघात प्रकाश जावडेकरांनी केला आहे. “काँग्रेस २६ जानेवारी रोजी आंदोलकांना अशाप्रकारे भडकवेल अशी अपेक्षा नव्हती. यावरून काँग्रेस किती खालच्या पातळीला घसरल्ये हे समजते.” असे जावडेकर म्हणाले. बहुतांशी आंदोलक हे पंजाब राज्यातील असून पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आहे आणि त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली असती तर ही वेळ आली नसती. असे जावडेकर यांनी म्हंटले आहे.
Press Conference at @BJP4India headquarters https://t.co/ijYNqWIDt5
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) January 27, 2021
“दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराची जेवढी निंदा करू तेवढी कमी आहे” असे म्हणत आंदोलकांना भडकावणाऱ्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. तिरंग्याचा असा अवमान भारत कधीही सहन करणार नाही, त्यामुळे काँग्रेस आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही असेही जावडेकर यांनी सांगितले आहे.
या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जावडेकरांनी दिल्ली पोलिसांचेही कौतुक केले आहे. “राजधानीत हिंसाचार घडत असताना पोलिसांनी दाखवलेला संयम कौतुकास्पद आहे. थोड्याच वेळात त्यांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आणली” असे म्हणत त्यांनी पोलिसांची पाठ थोपटली आहे.