वरळी सिलेंडर स्फोट दुर्घटना प्रकरणी मुंबईतील रुग्णालयांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून विरोधी पक्षाने महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला धारेवर धरले आहे. भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले असून महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना विपश्चनेचे (ध्यानधारणा) प्रशिक्षण देण्याबद्दल सुचवले आहे.
रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी सौजन्याने वागण्याचे आणि ध्यानधारणाचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी प्रकाश गंगाधरे यांनी केली आहे. तसेच स्थानिक नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने नागरिकांसाठी उत्तम दर्जाची सुविधा देण्याबाबत कार्यवाही व्हावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
हे ही वाचा:
कोस्टल रोड प्रकल्पाच्या सल्लागाराचीच होतेय कमाई
झूम मिटिंगमध्ये ९०० कर्मचाऱ्यांना सांगितले, आज तुमचा शेवटचा दिवस
२२वी मिसाईल व्हेसल स्क्वॉड्रन ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ पुरस्काराने सन्मानित
बेजबाबदारपणा आणि त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रुग्णालयाला कायमस्वरूपी एक जबाबदार वैद्यकीय अधीक्षक २४ तास उपलब्ध असणे गरजेचे असते. त्याचे काम २४ असते आणि आपत्कालीन प्रसंगी त्याने रुग्णालयात हजर राहणे गरजेचे असते. नायर रुग्णालयात हे अधीक्षक सायंकाळी ४ वाजे पर्यंतच असतात त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नाही, असे प्रकाश गंगाधरे यांनी पत्रात म्हटले आहे. वरिष्ठ डॉक्टरांचा असा कारभार असल्यास इतर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लोकांनी काय अपेक्षा ठेवायच्या असा सवालही त्यांनी विचारला आहे.
वरळी सिलेंडर स्फोट घटनेतील चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात प्रशासनाच्या आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे सुरुवातीच्या एक तासापेक्षा जास्त वेळ डॉक्टरांनी कोणतेही उपचार न केल्यामुळे त्यातील छोट्या बालकाचा मृत्यू झाला होता यावरून विरोधी पक्षाने सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरले होते.