“मविआमधून आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला”

प्रकाश आंबेडकर यांची टीका; संजय राऊतांवरही डागले टीकास्त्र

“मविआमधून आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला”

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपावरून अद्यापही धुसपूस असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही मविआची साथ सोडली आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही मविआशी काडीमोड घेत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली आहे.

महाविकास आघाडीत आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच येत्या २ एप्रिल रोजी सर्व स्पष्ट करणार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवार, २९ मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्याशी चर्चा सुरू असेपर्यंत मविआ आणि वंचितमध्ये सर्व सकारात्मक होते. चर्चाही पुढे जात होती. पण, नंतर कुणी तरी कुणासाठी आम्हाला वापरून घेत असल्याचे दिसू लागले, असा आरोप करत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ठाकरे गट आणि काँग्रेस यांचे सूत जुळलेले नाही, हे आधीपासून सांगत होतो, ते आता उघड होऊ लागले आहे. राज्यात ज्या पद्धतीने विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे, तो राहत नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधी आघाडी उभी राहावी, असं मत होते. पण, आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. आता आम्ही इतरांना सोबत घेऊन नवी आघाडी करत आहोत. कुणाला बाजुला टाकू नये, सर्वांना सोबत घेऊन काम करावे, असे आमचे म्हणणे आहे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मांडली. “माझे दरवाजे आजही बंद झालेले नाहीत. सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत. आम्ही विविध संघटनांशी चर्चा करत आहोत, त्यांच्याबरोबर कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची, याचा अजेंडा तयार केला जातोय,” यावर विचार सुरू असल्याचे आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा:

डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा

२०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येणार

वकिलांच्या पत्रानंतर पंतप्रधान मोदी यांची काँग्रेस नेत्यांवर टीका

बेंगळुरूतील कॅफे स्फोटातील मुख्य संशयिताला अटक

संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या नावाने चुकीची माहिती देत आहेत. ते आघाडीत बिघाडी करण्याचे काम करत आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. मराठा समाज आता प्रत्येक मतदारसंघातून एकच उमेदवार देण्याचे ठरत आहे. जरांगे-पाटील यांच्याकडून स्पष्ट होईल, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. भाजपाला मोकळे रान देऊ इच्छित नव्हतो, म्हणून आम्ही उमेदवार दिले. ही लढाई वंचित विरूद्ध भाजप अशी असेल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Exit mobile version