राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मागितले होते, पण…

प्रफुल्ल पटेल यांनी केला गौप्यस्फोट

राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मागितले होते, पण…

एकीकडे अमित शहा यांच्याशी बंद दाराआड झालेल्या चर्चेबद्दल उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमधून नेहमीच उल्लेख करत असताना आता राष्ट्रवादीच्या त्यांच्याशी बंद दाराआड झालेल्या चर्चेचा आणखी एक प्रसंग समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या एका भाषणात हा किस्सा सांगितला आहे.

 

अजित पवार यांनी शरद पवार यांचे नेतृत्व झुगारून महाराष्ट्राच्या सत्तेत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी भाजपासोबत जाण्यासाठी केव्हा केव्हा बोलणी केली, ती कशी फिस्कटली आणि आयत्या वेळी माघार घेण्यास सांगण्यात आले, याची कहाणी सांगितली होती. आता प्रफुल्ल पटेल यांनी आणखी एक नवा प्रसंग सांगून सर्वांनाच चकीत केले आहे.

 

ते आपल्या भाषणात म्हणाले की, राष्ट्रवादीने महायुतीत जाण्यासाठी २०१९ पासून चर्चा सुरू होती. २०१९मध्ये काँग्रेससोबत युती केली आणि निवडणुकीत ५४ आमदार निवडून आले. पण त्यानंतर सरकार होत नसल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली. तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. तेव्हा आमच्या मनात प्रश्न आला की, शिवसेना तर आपला मित्रपक्ष नाही मग त्यांच्याशी एवढी जवळीक कशाला? शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे ठरले होते. तेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित केला की, आपले ५४ आमदार आहेत त्यांचे ५६. मग आपण अडीच अडीच वर्षे सत्ता का वाटून घेऊ नये? आम्ही हा प्रश्न विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंना भेटलो. त्यांना हे सांगितले पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. आम्हाला सत्ता हवी होती असे नाही पण आमच्याकडेही संख्याबळ होते मग आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद का मिळू नये असा आमचा विचार होता. पण उद्धव ठाकरे आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हते.

हे ही वाचा:

जालन्याचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

अदानी-अंबानींना लक्ष्य करून देशाची घडी विस्कटण्याचा प्रयत्न

सेव्हन हिल्समध्ये गरीब रुग्णांना मोफत सेवा पुरवा!

लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्याने केले ठार

पटेल म्हणाले की, २००४मध्येही आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळू शकले असते. कारण तेव्हा राष्ट्रवादीच्या काँग्रेसपेक्षा अधिक जागा आल्या होत्या, पण तेव्हादेखील मुख्यमंत्रीपद काँग्रेसलाच दिले गेले. नेहमी राष्ट्रवादीनेच त्याग कराय़चा का? विदर्भात, नागपुरात राष्ट्रवादीची ताकद वाढेल. महायुतीत गेलो म्हणजे ताकद वाढणार नाही असे अजिबात नाही. विदर्भातील जागाही आपण जिंकू.

 

उद्धव ठाकरे यांच्याकडून नेहमीच अमित शहांशी बंद दारा आड झालेल्या चर्चेचा उल्लेख येतो आणि त्यावेळी अडीच वर्षे मुख्यमंत्री देण्याचे त्यांनी मान्य न केल्यामुळे शेवटी आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जावे लागले असे उद्धव ठाकरे सांगतात. पण प्रफुल्ल पटेल यांच्या विधानामुळे राष्ट्रवादीला मात्र अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यास ते तयार नव्हते हे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version