एमपीएसी परीक्षा पुढे ढकला, राज ठाकरेंची मागणी

एमपीएसी परीक्षा पुढे ढकला, राज ठाकरेंची मागणी

राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी दोघांमध्ये एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आश्वासन दिले नसले तरी त्यांची भूमिका सकारात्मक असल्याचे समजते.

एमपीएससीची पूर्व परीक्षा ११ एप्रिलला होणार आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष गोष्ट म्हणजे गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे.

कोरोनाचा वाढता धोका पाहता परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोव्हिड विषाणूची लागण होऊ शकते. तर अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वीच कोरोना झाला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आता संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.

हे ही वाचा:

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरवात

मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला रेमडेसिविरचा काळाबाजार

अमेरिका- युरोपने कोविशिल्डचा कच्चा माल रोखला

काय डेंजर वारा सुटलाय

याचबरोबर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत यासंदर्भातील मागणी केली आहे. “सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करतो. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता, या महिन्यात होणारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा सुद्धा समोर ढकलण्यात यावी, याबाबद्दल सुद्धा तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.” असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Exit mobile version