पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुरावे नष्ट केले जाण्याची भीती भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलेली आहे. या प्रकरणाच्या व्हिडियो क्लिप्स व्हायल झालेल्या आहेत. त्याच्यात पूजाच्या मोबाईलचा उल्लेख असून तो गायब करण्याबाबत संवाद आहेत. त्यावरून या शक्यतेला बळ मिळतं.
मागील काही दिवस महाराष्ट्रात गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. यात नाव आलेल्या वन मंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केला आहे. मात्र त्यावरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरायला सुरूवात केली आहे.
हे ही वाचा:
“संजय राठोड यांना बंजारा समाजाचा पाठिंबा नाही”- भाजपा नेते गिरीश व्यास
आता भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील पूजा चव्हाण प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. त्याबरोबरच नुसता राजीनामा उपयोगाचा नसून राठोड याच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. संजय राठोड याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्यपालांकडे मंजूरीसाठी पाठवावा असेही अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. निलेश राणे यांनी देखील ‘राजीनामा दिला म्हणजे उपकार केले नाहीत’ असे म्हटले होते.
वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मंजुरीसाठी ताबडतोब राज्यपालांकडे पाठवावा.
परंतु केवळ राजीनामा पुरेसा नाही संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी. pic.twitter.com/8zEC6kUjTd— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 16, 2021
पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. संजय राठोड याच्या चौकशीची मागणी देखील जोर धरू लागली आहे. संजय राठोड याच्या राजीनाम्यामुळे या प्रकरणातील पेच वाढला आहे. संजय राठोड यांना बंजारा समाजाचा पाठिंबा नसल्याचे भाजपाचे नेते गिरिश व्यास यांनी म्हटले आहे.