गोवा सरकारने स्थापन केलेल्या पुरातत्त्व विभागाच्या समितीने संपूर्ण राज्यात फिरून जमा केलेल्या माहितीनुसार, पोर्तुगीजांनी तब्बल एक हजार मंदिरे जमीनदोस्त केल्याचे उघड झाले आहे. मात्र ही एक हजार मंदिरे पुन्हा उभारणे शक्य नसल्याने या मंदिरांच्या ऐवजी एका स्मारक मंदिराची निर्मिती करावी, अशी शिफारस समितीने केली आहे. गोव्याचे मंत्री सुभाष पाल देसाई यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
राज्यातील तोडण्यात आलेल्या मंदिरांची माहिती जमा करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती. गोवा सरकारने या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली होती. समितीने सादर केलेल्या १० पानी अहवालात तिसवाडी, बारदेज आणि सैलसेट तालुक्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या भागांत सर्वाधिक मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली, असे नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
वकील सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी तिघांना अटक
चेक प्रजासत्ताकमध्ये १० लाख डॉलरचा पाऊस!
बीड मध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यू
मॅक्सवेलच्या वर्ल्डकपमधील वादळी शतकामुळे नेदरलँडसचा पालापाचोळा
या समितीच्या आधी एका टास्क फोर्सनेही या मंदिरांची ओळख पटवली होती. मात्र पोर्तुगीजांनी तोडलेल्या मंदिरांची संख्या इतकी आहे की, या मंदिरांचा जीर्णोद्धार करणे आता शक्य नाही. सर्वाधिक आव्हान हे भूसंपादनाचे असेल. त्यामुळेच समितीने या मंदिरांचे एक स्मारक बनवण्याची शिफारस केली आहे. तसेच, समितीने अन्य ठिकाणीही खोदकाम करून शोध घेतला जावा, असे सुचवले आहे.
दीवर बेटावर सप्तकोटेश्वर मंदिर पुन्हा बांधण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. कदंबर राजवटीत या बेटावर मंदिर बनवण्यात आले होते. मात्र पोर्तुगीजांनी हे मंदिर १६व्या शतकात जमीनदोस्त केले होते. या परिसराची संपूर्ण जमीन सरकारच्या ताब्यात आहे. ही एक संरक्षित जागा असल्याने येथे मंदिराची निर्मिती करता येईल, अशी आशा समितीने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी मंदिराचे खांब वा छोटे अवशेष मिळाले आहेत. त्यासाठी समितीने येथे आणखी शोध आणि खोदकामाची शिफारस केली आहे.