नवीन संसद भवनाचे उद्घाटन २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाची सुरुवात महात्मा गांधी पुतळ्याजवळ हवन आणि पूजेने होईल. त्यानंतर लोकसभेच्या आत ‘सेंगोल’ची स्थापना होणार आहे. उद्घाटनात भव्य पूजा, सेंगोलची प्रतिष्ठापना, दोन लघुपटांचे प्रदर्शन आणि स्मृती नाणे आणि शिक्क्याचे प्रकाशन यांचा समावेश असेल.
उद्घाटन समारंभाचे तपशीलवार वेळापत्रक
सकाळी साडेसात वाजता महात्मा गांधी पुतळ्याजवळ हवन व पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती यांचा समावेश असेल.
पूजेनंतर लोकसभेच्या आत सेंगोलची स्थापना सकाळी साडेआठ ते नऊ या वेळेत होईल. पंतप्रधान मोदी संसदेच्या नवीन इमारतीत अध्यक्षांच्या आसनाजवळ एका काचेच्या आत ऐतिहासिक राजदंड स्थापित करतील. ‘अधिनाम्स’ (तामिळनाडूतील शैव मठातील पुजारी), ऐतिहासिक सेंगोल बनवण्याचे काम सोपवण्यात आलेले वुम्मीदी बंगारू ज्वेलर्स आणि नवीन संसद भवन बांधणाऱ्यांचा गौरव केला जाईल.
हे ही वाचा:
नरेंद्र मोदी ३००पेक्षा अधिक जागांसह तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील!
इंग्रजांनी बांधलेल्या जुन्या संसद भवनाचे काय होणार?
बिहारमध्ये रक्षकच झाले भक्षक; पोलिसाचा महिलेवर आठ दिवस बलात्कार
मोफत तिकीट द्या, वीज द्या…कर्नाटकवासी काँग्रेस सरकारच्या लागले मागे
सकाळी साडेनऊ वाजता प्रार्थना सभा होईल. यावेळी शंकराचार्य, विद्वान, पंडित आणि संत उपस्थित राहतील.
कार्यक्रमाचा दुसरा टप्पा दुपारी १२ वाजता राष्ट्रगीताने सुरू होईल. यावेळी दोन लघुपट दाखविण्यात येणार आहेत.
राज्यसभेचे उपसभापती स्वागतपर भाषण करतील. उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतींचे संदेशही वाचून दाखविले जातील.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे या मेळाव्याला संबोधित करतील. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचेही भाषण होईल आणि या दिवसाच्या स्मरणार्थ नाणे आणि तिकिटाचे प्रकाशन केले जाईल. दुपारी २.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता होईल.