पुदुचेरीतील सरकार कोसळले, काँग्रेसने अजून एक राज्य गमावले

पुदुचेरीतील सरकार कोसळले, काँग्रेसने अजून एक राज्य गमावले

पुदुचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळल्या नंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी हे आता राजीनामा देणार आहेत. रविवारी दोन आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सरकारचे संख्याबळ हे १२ पर्यंत आले. जिथे बहुमतासाठी १४ आमदार आवश्यक आहेत. पुदुचेरी विधानसभेत बहुमत सिद्ध करताना नारायणसामी यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता.

काँग्रसचे आमदार लक्ष्मीनारायण आणि डीएमकेचे आमदार वेंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यापूर्वीच काँग्रेसच्या चार आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पुदुचेरी विधानसभेत काठावरचे बहुमत असणारे काँग्रेसचे सरकार धोक्यात आले होते.

या दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे ३३ सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-डीएमके आघाडीच्या आमदारांची संख्या घटून ११ झाली आहे. तर विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या १४ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नारायणसामी आज बहुमत चाचणीत काही राजकीय चमत्कार करुन दाखवणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते.

हे ही वाचा:

आज पुदुचेरीत सत्ताबदल होणार?

परंतु आज झालेल्या बहुमत चाचणीमध्ये मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यांनी बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे अशी माहिती माध्यमांना दिली. मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीही उप राज्यपालांकडे राजीनामे सोपवले आहेत.

Exit mobile version