एसटी कर्मचाऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात केलेल्या एफआयआरमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, पोलिसांना या आंदोलनाची माहिती मिळाली होती. ८ एप्रिलला आंदोलनकर्ते सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी गोळा होतील असे कळले होते.
त्यादृष्टीने पोलिस हवालदार सतीश पुंडलिक पांडव आणि देवराम आव्हाड यांनी ही माहिती वरिष्ठ जाधव यांना दिली. त्यानंतर ८ एप्रिलला दुपारी ३ वाजता गावदेवी मोबाईल १ व इतर पोलिस अंमलदारांसह बी डी रोडकडून सिल्व्हर ओककडे जाणाऱ्या रस्त्यावरती पोलिस तैनात करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेटिंग करण्यात आले होते. या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की, साधारणपणे साडेतीन वाजता ९० ते १०० एसटी कर्मचारी बी डी रोड येथे जमा झाले. तेव्हा पोलिसांनी या आंदोलकांना आझाद मैदानाकडे जाण्यास सांगितले. सिल्व्हर ओकला जाऊ नका असेही त्यांना विनवले. पण पोलिसांना धक्काबुक्की करून ते सिव्ल्हर ओकच्या दिशेने निघाले. जाताना त्यांनी चपला भिरकावल्या, दगडफेक केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना प्रसंगावधान राखून दुसऱ्या दिशेला वळवले. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिक मनुष्यबळ मागविण्यात आले. त्यातील १०४ आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. त्यात २३ महिलांचा समावेश होता.
हे ही वाचा:
गोव्याच्या मंत्रिमंडळात आता झाले १२ मंत्री
तलहा सईदला भारताने घोषित केले दहशतवादी
‘लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न’
मध्यरात्री योगी आदित्यनाथ यांचे ट्विटर हँडल हॅक
या आंदोलनानंतर या आंदोलनकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप ठेवून त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आणि आता त्यांना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाय, १०९ जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर सदावर्ते यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांच्या घरात घुसून जाब विचारू अशी घोषणा केल्याचे पोलिसांनी या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.