८६ पोलिस जखमी; २२ एफआयआर दाखल
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला हिंसक रूप मिळाले. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात ८६ पोलिस जखमी झाले. हिंसाचार करणाऱ्यांनी दिल्लीच्या ८ सार्वजनिक वाहतूक बसेस आणि १७ खासगी गाड्यांची तोडफोड केली.
काल हिंसाचार झाल्यानंतर आज पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. या हिंसाचाराबद्दल पोलिसांनी २२ प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून घेतले आहेत. यात अनेक नेत्यांची नावे आहेत. या चौकशी कार्यात क्राईम ब्रांच आणि स्पेशल सेल देखील सामिल होण्याची शक्यता आहे.
विविध ठिकाणी हिंसाचार करणाऱ्यांनी पोलिसांना जखमी केले. हा हिंसाचार जास्ती करून मुकरबा चौक, गाझीपूर, आयटीओ, सीमापूरी, नान्ग्लोई टी- पॉईंट, टिक्री सीमा आणि लाल किल्ला परिसरात जास्त प्रमाणात दिसून आला.
प्रजासत्ताक दिनीच ट्रॅक्टर रॅली काढण्यावरून दिल्ली पोलिस आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्यात चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या एकमताने या रॅलीसाठी ठराविक मार्ग निश्चित करण्यात आले. परंतू वास्तविक ही रॅली अहिंसक न राहता, आत्यंतिक हिंसाचाराच्याच मार्गवर गेली. दिल्ली पोलिसांच्या सांगण्यानुसार सिंघू सिमेवर जमलेल्या सहा हजार ते सात हजार ट्रॅक्टर चालकांनी ठरलेल्या रस्त्यावरून न जाता सेंट्रल दिल्लीकडे जाण्याचा आग्रह धरला. परंतु आंदोलक नेत्यांच्या अनुसार हा आकडा एक लाख ट्रॅक्टर्स पर्यंत गेलेला होता. त्यावेळी घोड्यावर स्वार असलेल्या, तलवारी, कृपाण आणि कुऱ्हाड सारख्या हत्यारांनी सज्ज असलेल्या निहंगांनी पोलिसांवर हल्ला करायला सुरूवात केली. यानंतर तथाकथित आंदोलनकर्त्यांनी दिल्लीत हिंसाचराला सुरूवात केली.