नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले

नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सागर निवासस्थानाकडे जात असतानाच पोलिसांनी पटोले यांना अडवले आहे. तुम्हाला आंदोलन करता येणार नाही. आझाद मैदानात जा, असे पोलिसांनी नाना पटोले यांना सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी नाना पटोले हे त्यांच्या निवासस्थानातून निघाले होते. त्यांच्यासोबत शेकडो वारकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते टाळमृदुंग वाजवत होते. नाना पटोले हे पायीच सागर निवासस्थानाकडे निघाले होते. तितक्यात पोलिसांनी त्यांना अडवले आणि सागर निवासस्थानाकडे जाण्यास मज्जाव केला.

त्यामुळे आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांचे आंदोलन गुंडाळले आहे. आम्हाला फक्त मेसेज द्यायचा आहे. आम्ही आहे तिथून आंदोलन करू. आझाद मैदानात जाणार नाही, असे नाना पटोले यांनी पोलिसांना सांगितले. तसेच पटोलेंनी वारकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा:

२०२२ मधील इस्रोची पहिली मोहीम फत्ते

उत्तराखंडमध्ये पुष्कर ठरणार Fire?

एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

धक्कादायक! चंद्रभागेचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज १४ फेब्रुवारी रोजी निषेध दर्शवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच सागर बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. बंगल्याकडे जाणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. सागर निवासस्थानी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे हे देखील पोहचले होते. त्यांनी भाजप विरुद्ध घोषणा देताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version