नव्या घोटाळ्याची भरती; पोलीस परीक्षेत घोळ

नव्या घोटाळ्याची भरती; पोलीस परीक्षेत घोळ

राज्यातील बहुतांश भरती परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या असताना आता अजून एका परीक्षेत घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हाडा नोकर भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. प्रीतिश देशमुखच्या चौकशीदरम्यान टीईटी परीक्षेतला गैरप्रकार उघडकीस आला. आता डॉ. प्रीतिश देशमुखच्या घरात पोलीस भरतीची ओळखपत्रे सापडल्याने पोलीस भरती देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

पोलीस भरतीची ओळखपत्रे देशमुख याच्या घरात सापडल्याने आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी आणि आता पोलीस भरतीची परीक्षासुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्या घरातून आता २०१९ आणि २०२१ सालच्या पोलीस भरती परीक्षेतील तीन विद्यार्थ्यांची ओळखपत्रे पुणे पोलिसांच्या हाती लागली आहेत.

हे ही वाचा:

व्हॅटिकनच्या भेटीत पोप फ्रान्सिस काय म्हणाले होते, पंतप्रधान मोदींना

‘सत्तेच्या अनेक उलथापालथनंतरही गोवा भारतीयत्व विसरला नाही; भारत गोव्याला विसरला नाही’

गोवा मुक्ती दिनावर बाळासाहेबांनी काढलेले हे भन्नाट व्यंगचित्र

केरळमध्ये पुन्हा फोफावला राजकीय हिंसाचार! १२ तासात २ हत्या

या कंपनीने कोल्हापूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, सोलापूर आदी ठिकाणी पोलीस भरती परीक्षा घेतल्या आहेत. प्रीतिश देशमुखच्या घरात आणि कंपनीच्या कार्यालयात आत्तापर्यत २३ हार्ड डिस्क, ४१ सीडी, एक फ्लॉपी डिस्क व इतर कागदपत्रे सापडली आहेत. या आधी त्याच्या घरी टीईटी परीक्षांची अपात्र परीक्षार्थींची ओळखपत्रे सापडले होते. त्यावरून पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना अटक केली.

Exit mobile version