पंतप्रधानांकडून ऑडिट करण्याचे आदेश
एकीकडे केंद्राने सर्व राज्यांना कोरोनाच्या या संकटकाळात मदतीचा हात दिलेला असतानाही केंद्राकडे बोट दाखविण्याचे प्रयत्न सुरूच आहे. आता केंद्र सरकारने कोरोनाकाळात दिलेले व्हेंटिलेटर्स न वापरताच पडून राहिल्याचे समोर येऊ लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची चौकशी करून त्यांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या या व्हेंटिलेटर्सचा उपयोग का करण्यात येत नाही, ते तसेच पडून का आहेत, याबद्दल मोदी यांनी विचारणा केली आहे. परदेशातून जी मदत आली आहे त्यात जवळपास ८ हजार व्हेंटिलेटर्स आहेत. पण त्यांचा वापर वेगवेगळ्या कारणांमुळे राज्यांकडून केला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पीएम केअर्स निधीच्या अंतर्गत राज्यांना देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सचा वापर कसा करण्यात आला आहे, यासंदर्भात राज्यांना विचारणा करण्यात आली होती, त्याबाबत पंतप्रधानांनी शनिवारी आढावा घेतला. तेव्हाच पंतप्रधानांनी या व्हेंटिलेटर्सच्या ऑडिटचे आदेश दिले होते.
हे ही वाचा:
रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी सुरु केले २० वर्ष बंद पडलेले हॉस्पिटल
तौक्ते वादळाचा कर्नाटक,गोव्याला तडाखा… गुजरात अलर्टवर
ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी व्हेंटिलेटर्स काम करत नसल्याचे म्हटले होते तर केंद्राने या व्हेंटिलेटर्सचे खोकेच उघडले गेले नसल्याचा दावा केला होता.
पंतप्रधांनांनी त्या आढावा बैठकीत सांगितले होते की, व्हेंटिलेटर्सचा उपयोग कसा करावा यासंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.
महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्हेंटिलेटर्सच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर्सचे पॅकिंगही उघडण्यात न आल्यामुळे ते धूळ खात पडून आहेत, असे फडणवीस म्हणाले.
बिहारमध्ये पाठविण्यात आलेल्या १०९ व्हेंटिलेटर्सपैकी अर्धे व्हेटिंलेटर्स १३ जिल्ह्यांना पाठविण्यात आले पण तंत्रज्ञांअभावी ते वापरले गेले नाहीत, असा दावा करण्यात आला. कर्नाटकमध्येही पाठविण्यात आलेले व्हेंटिलेटर्स तंत्रज्ञांअभावी पडून असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीतील फरिदकोट येथे सरकारी रुग्णालयात केंद्राने पाठविलेल्या व्हेंटिलेटर्स एका खोलीत पडून असल्याचे ट्विट आम आदमी पार्टीच्या एका आमदाराने केले होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पीएम केअर्स फंडातून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सचे ऑडिट करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.