पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी स्वत:चा ७३वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये झाला. त्यांचे वडील दामोदर दास वडनगरस्थित रेल्वे स्थानकावर चहाचे दुकान चालवत.
वडनगरमधील शाळेत मोदींना नववी, दहावी आणि अकरावीत संस्कृत शिकवणारे प्रल्हाद पटेल यांनी त्यांच्याबद्दल अधिक माहिती दिली.
‘मी नरेंद्रला नरिया म्हणत असे. ते वर्गात सत्य सांगताना कधीच घाबरत नसत. ते मस्तीखोर होते, मात्र सर्व गुरुजनांचा आदरही करत,’ असे पटेल यांनी सांगितले. तर, त्यांचे जासूद भाई सांगतात, ‘लहानपणी आम्ही सर्व मित्र त्यांना एनडी म्हणून हाक मारत असू. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले, त्यानंतर ते आम्हा मित्रमंडळींना भेटले. मी त्यांना एनडी अशी हाक मारली. तेव्हा ते हसले.’
मोदी यांना मोठेपणी लष्करात भर्ती होण्याचे स्वप्न होते. त्यांना लहानपणी वडनगर येथील सैनिकी शाळेत शिकायचे होते. मात्र पैशांअभावी ते तिथे शिकू शकले नाहीत. वयाच्या आठव्या वर्षीच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले.
मोदी यांना लहानपणी अभिनयाची आवड होती.
सन २०१३मध्ये मोदी यांच्यावर लिहिलेल्या ‘द मॅन ऑफ द मोमेंट : नरेंद्र मोदी’ या पुस्तकानुसार, ते १३-१४ वर्षांचे असताना त्यांनी शाळेसाठी निधी जमा करण्यासाठी शाळेतील मुलांसह एका नाटकात भाग घेतला होता. या नाटकाचे नाव ‘पिलू फुल’ म्हणजेच पिवळे फूल असे होते. पंतप्रधान मोदी यांनी एका त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला होता. ते अनेकदा लहानपणी न सांगता लग्नाला जात असत आणि दोघा व्यक्तींचे कपडे पिनने जोडत असत. हे पाहून तेथील लोक हसत असत.
हे ही वाचा:
उरीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; मृतदेह ताब्यात घेत असताना पाकिस्तान लष्कराकडून गोळीबार
भाजपाची बी-टीम नेमकी कोणती? मोदी कोणाला वाचवतायत?
सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल, सेंड अँड्र्यूज कॉलेजला जेतेपद
शालेय शिक्षण पूर्ण होताच मोदी हे संन्यासी होण्यासाठी घरातून पळाले होते. त्यानंतर ते पश्चिम बंगालच्या रामकृष्ण आश्रमासहित देशातील अनेक ठिकाणी गेले होते. हिमाचलमध्ये अनेक दिवस साधूसंतांसोबत राहिले. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, संन्याशी न होताही राष्ट्रसेवा करता येऊ शकते. त्यानंतर ते गुजरातला पोहोचले आणि त्यांनी संन्याशी होण्याचा निर्णय मागे घेतला. सन १९७८मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले. आरएसएसच्या नेत्यांच्या रेल्वेगाड्या आणि बसची आगाऊ नोंदणी करण्याचे काम त्यांच्याकडेच असायचे. त्यांना पतंग उडवायला फार आवडत असे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेकदा पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते.