पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे मंगळवार, २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रवाना होणार आहेत. या परिषदेत आर्थिक सहकार्य, अन्न सुरक्षा, ब्रिक्सचा विस्तार या विषयांवर चर्चा होणार आहे. मात्र पंतप्रधान मोदी या परिषदेत अन्य देशांच्या सुरक्षेला प्रत्येक देशाने प्राधान्य देण्याची गरज आणि दहशतवादाला एकजुटीने विरोध करण्याचे आवाहन करतील, अशी अटकळ बांधली जात आहे.
या परिषदेत जगभरातील ५० देशांचे सर्वोच्च प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ब्राझीलचे लुईज लाला डिसिल्व्हा आणि स्वत: पंतप्रधान मोदी यांचा समावेश आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आभासी पद्धतीने यात सहभागी होतील.
हे ही वाचा:
चांद्रयान २३ ऑगस्टला संध्याकाळी चंद्रावर उतरणार
‘पुढील ३० वर्षे पंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपचेच वर्चस्व’
स्पेनच्या महिला संघाची कमाल; पहिल्यांदाच जिंकले फुटबॉलचे विश्वविजेतेपद
तिकीट विक्री, वाढलेले हॉटेलचे दर, विमानांचे भाडे यावरून चाहते नाराज !
पंतप्रधान मोदी मंगळवारी या व्यावसायिक फोरमला संबोधित करतील. संपूर्ण जग अजूनही करोना साथीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत ‘ब्रिक्स’व्यासपीठाची गरज, युक्रेन युद्ध आणि भारताने डिजिटल क्रांतीत तसेच, लोकांपर्यंत सहज सुविधा पोहोचवण्यात मिळवलेले यश याचा ऊहापोह मोदी आपल्या भाषणात करण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी बाली येथे झालेल्या जी २० परिषदेत मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्यात धावती चर्चा झाली होती. मात्र या परिषदेत दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांनी अशी द्विपक्षीय चर्चा होईलच, याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मात्र दोन्ही सर्वोच्च नेते जोहान्सबर्ग येथे ४८ तास एकत्र असणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा चर्चा होईल, अशी अटकळ बांधली जात आहे.आणखी २२ देश ब्रिक्समध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना सहभागी करून घेण्याबाबतही या परिषदेत चर्चा होणार आहे.