पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सज्ज झाली काशी

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सज्ज झाली काशी

काशी विश्वनाथ धामचे आज होणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी ऐतिहासिक काशी नगरी सज्ज झाली आहे. सोमवार, १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी काशी मध्ये दाखल होणार आहेत. काशी विश्वनाथ धामच्या ऐतिहासिक प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे पवित्र असे काशी विश्वनाथ मंदिर हे गंगा नदीच्या सर्व किनाऱ्यांची जोडले जाणार आहे. तर या प्रकल्पा अंतर्गत ४० पेक्षा अधिक प्राचीन मंदिरांचा शोध घेऊन त्यांच्या पुनरुज्जीवन आणि सौंदर्यकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

या प्रकल्पाच्या आधी काशी विश्वनाथ मंदिराचा परिसर तीन हजार चौरस फूटांवर पसरलेला होता. पण आता या नव्या भव्य प्रकल्पांतर्गत हा परिसर पाच लाख चौरस फुटांवर विस्तारलेला असणार आहे. काशी विश्वनाथ धामच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी २३ नव्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारतीतून नागरिकांना विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी ३०० पेक्षा अधिक मालमत्तांच्या भूसंपादनाची प्रक्रिया सरकार मार्फत पूर्ण करण्यात आली. विशेष म्हणजे ही प्रक्रिया परस्पर सामंजस्यातून पूर्ण करण्यात आली आहे

८ मार्च २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या जागेचे भूमिपूजन करण्यात आले. पंतप्रधान मोदी जातीने या संपूर्ण प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवून होते. तर या प्रकल्पाच्या संदर्भात नियमितपणे माहिती घेणे, आढावा घेणे, देखरेखीचे काम करणे हे देखील करत होते. सुमारे ३३९ कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात उदघाटन होणाऱ्या तेवीस इमारतींमध्ये यात्री सुविधा केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, वैदिक केंद्र, भोगशाला, शहर वस्तुसंग्रहालय, फूड कोर्ट, पर्यटक गॅलरी अशा विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

हे ही वाचा:

‘म्हाडा’ भरती परीक्षेत दलालांचा सुळसुळाट? आव्हाड म्हणतात…

‘म्हाडा’ ची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींचा संताप

नोकरी देऊ शकत नसाल तर किमान अशी थट्टा तरी करू नका

…म्हणून पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक झाले?

या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ आणि १४ डिसेंबर या दोन दिवशी काशीच्या दौऱ्यावर असणार आहेत. १३ तारखेला दुपारी १२ वाजता ते कालभैरव मंदीराला भेट देतील. तर सायंकाळी सहा वाजता रो रो जहाजातून गंगा आरतीचे साक्षीदार होणार आहेत.

१४ डिसेंबर रोजी, दुपारी ३.३० वाजता, पंतप्रधान वाराणसीतील स्वरवेद महामंदिर येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या ९८ व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील.

या दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि बिहार आणि नागालँडच्या उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेल्या परिषदेत सहभागी होणार आहेत. ही परिषद टीम इंडियाच्या भावनेला पुढे नेण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत प्रशासनाशी संबंधित सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याची संधी प्रदान करेल.

Exit mobile version