नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी उद्घाटन झाले आणि पंतप्रधानांनी लोकशाहीचे हे मंदिर भारतवासियांना अर्पण केले. पूजा, होमहवन, मंत्रोच्चार, सेंगोल तथा राजदंडाची प्रतिष्ठापना नंतर नव्या संसद भवनाच्या कोनशिलेचे अनावरण अशा भव्य स्वरूपात संसद भवनाचे उद्घाटन पार पडले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यावेळी उपस्थित होते. अत्यंत शानदार अशा या सोहळ्याला सकाळी ७.१५ वाजता प्रारंभ झाला. साधूसंतांच्या वैदिक मंत्रोच्चारात कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या परिसरता मंगल सूर निनादत होते. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत तिथे प्रथम पूजा विधी पार पडले. त्यानंतर पंतप्रधानांनी सेंगोल तथा राजदंडाचे दर्शन घेतले.
तामिळनाडूहून खास दिल्लीत आलेल्या अधिनम मठाच्या संतांनी हा राजदंड पंतप्रधानांच्या हाती सोपविला आणि नंतर त्यांच्यावर मंत्रोच्चारात फुले टाकली, आशीर्वाद दिले. मग पंतप्रधानांनी हा राजदंड घेऊन लोकसभेतील लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी असलेल्या जागेत त्याची प्रतिष्ठापना केली. त्याला वंदन केले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी कोनशिलांचे अनावरण करून या संसद भवनाचे लोकार्पण पूर्ण केले. तिथे तीन पाट्या असून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपस्थितांची नावे लिहिण्यात आली आहेत.
हे ही वाचा:
डेंग्युच्या अळ्या सापडल्यामुळे १२० सोसायट्यांवर दाखल केले गुन्हे
विरोधकांना आझादांनी दाखविला आरसा
शिवसेना पदाधिकारी शब्बीर शेखची चॉपरचे वार करून हत्या
पोक्सो कायद्याचा गैरवापर होत आहे! बृजभूषण सिंह यांची मागणी
पूजाविधी सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्प अर्पण केली. मग पूजाविधी सुरू झाले. देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही २७ मे रोजीच तिथे दाखल झाले होते. पूजाविधी पार पडल्यानंतर तिथे सर्व धर्मीयांची प्रार्थनाही झाली. प्रत्येक धर्माचे धर्मपंडित तिथे आले होते. त्यांनी आपापल्या धर्माची प्रार्थना करून संसदेचा सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. या सोहळ्यानंतर पंतप्रधानांनी या संसद भवनाच्या कामात ज्यांनी योगदान दिले त्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. त्यांना शाल प्रदान करून मोदींनी त्यांचे हालहवालही विचारले.